17 Oct 2022

अध्याय 10 – विभूतीयोग (विभूती – चिंतन योग)

सारांश :

गीतेच्या पूर्वार्धावर दृष्टिक्षेप –

मित्रांनो  गीतेचा पूर्वार्ध संपला. त्याचे थोडक्यात सार पाहू . 

पहिल्या अध्यायात गीता ही मोह-नाशार्थ व स्वधर्म प्रवृत्यर्थ आहे असे सांगितले आहे . दुसऱ्या अध्यायात जीवनाचे सिद्धांत ,कर्मयोग व स्थितप्रज्ञ यांचे आपल्याला दर्शन झाले. तीन,चार व पाच या अध्यायांत कर्म,अकर्म ,विक्रम यांचा उलगडा झाला . कर्म म्हणजे स्व धर्म आचरण करणे ,विकर्म  म्हणजे बाहेरून स्वधर्माचे आचरण करत असताना आतून मानसिक कर्म ( विशेष मन लावून केलेले काम ) करावयाचे ते  आणि अकर्म म्हणजे कर्म व अकर्म दोन्ही एकरूप होऊन जेव्हा चित्ताची शुद्धी होते ते .वासना मावळतात ,विकार शमतात,भेदभाव नाहीसा होतो तेव्हा अकर्म दशा आली असे म्हणावयाचे. अकर्म दशा कर्मयोग आणि संन्यास योग अशा दोन मार्गानी मिळवता येते, पण ही  अंतिम स्थिती एकच आहे . या स्थितीलाच मोक्ष हे नाव आहे.

सहाव्या अध्यायात चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यान योग सांगून ,अभ्यास व वैराग्य यांची त्याला जोड दिली आहे. सातव्या अध्यायात भक्तीचे थोर साधन सांगितले. आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्म योग ( ईश्वर शरणता )सांगितला आहे. यालाच विनोबांनी सातत्य योग्य असे ही  नाव दिले आहे. सातत्य योग्य म्हणजे आपली साधना अंत काळापर्यंत चालू ठेवणे. नवव्या अध्यायात आपण राजयोग पहिला.’जी जी कामे क्षणो क्षणी होतात , ती ती ईश्वरार्पण कर’ असे हा राज योग सांगतो.  म्हणून याला समर्पण योग असे ही  म्हणतात.हा राज योग किंवा समर्पण योग म्हणजे कर्मयोग आणि भक्ती योग यांचा मधुर मिलाप आहे. 

आजच्या दहाव्या अध्यायात ( विभूती चिंतन योगात ) ईश्वरार्पण योग कसा साधावा ही  गोष्ट आपणास पाहावयाची आहे.    

परमेश्वर -दर्शनाची बाळबोध रीत –

लहान मुलांना शिकवण्यासाठी आपण जो उपाय करतो तोच उपाय परमात्मा दिसण्यासाठी करावयाचा. मुलांना अक्षरे दोन प्रकारे शिकवतात .एक रीत म्हणजे प्रथम अक्षरे मोठमोठी काढून शिकवायची. पुढे तीच अक्षरे लहान काढून मग शिकवायची. तोच ‘क ‘ आणि ‘ग’ प्रथम मोठा व नंतर लहान. दुसरी रीत म्हणजे आधी साधी बिन घोटाळ्याची अक्षरे शिकवायची आणि नंतर घोटाळ्याची जोडाक्षरे. 

तसेच हुबेहूब आधी ठळक परमेश्वर पाहायचा.  समुद्र,पर्वत इत्यादीत प्रगट झालेला परमेश्वर चटकन दिसेल.हा ठळक परमेश्वर पटला मग एखाद्या जलबिंदूत,एखाद्या मातीच्या कणात ही तो दिसेल. जे स्थूलात तेच सूक्ष्मात हे लक्षात येईल. दुसरा प्रकार म्हणजे बिन घोटाळ्याचा सरळ परमात्मा आधी पाहायचा आणि मग जरा गुंतागुंतीचा. आधी राम  हे सरळ अक्षर शिका. सरळ परमेश्वराचे चटकन ज्ञान होईल. रावणाच्या ठिकाणचा पाहावयास जरा वेळ लागेल. सज्जनात प्रथम परमेश्वर पाहून मग दुर्जनात ही  तो पाहावयास शिकायचे. अशा दोन्ही प्रकारे हा जगाचा ग्रंथ वाचावयास शिकायचे. 

मानवातील परमेश्वर – 

प्रथम माता ,मग पिता,मग गुरु आणि मग कृपाळू संत. यांच्या ठिकाणी हा परमेश्वर ठळक पणे  दिसेल. यानंतर मुलांच्या ठिकाणी परमेश्वर शोधा. 

सृष्टीतला परमेश्वर–  

ती उषा ! सूर्योदयापूर्वीची ती दिव्या प्रभा ! या उषादेवी ची गाणी गाताना ऋषी नाचू लागत . येथे परमेश्वर दिसेल.

तो सूर्य पहा .त्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन.हा सूर्य म्हणजे जीवनाचा आधार आहे. सूर्य,नद्या ,तो धो धो करणारा आणि उचंबळणारा विशाल सागर या साऱ्या परमेश्वराच्या मूर्ती आहेत. 

ते वारे आपणास जागृत करतात ,परमेश्वराचा संदेश घेऊन येतात ,तो संदेश ऐका . 

वेदा  मध्ये अग्नीची उपासना सांगितली आहे. त्या अग्नी मध्ये आपण वैराग्य पाहू. 

प्राण्यांतील परमेश्वर– 

आपली कामकाज करणारी गुरे,गाय, बैल, घोडा या सर्वांत परमेश्वर दिसतो. जंगलातील वाघ,सिंह,वानर यांच्यात काय देव नाही? आणि ते पक्षी मोर,कोकिळा ,कावळा ही  सुद्धा परमेश्वराचीच रूपे आहेत. 

दुर्जनातही परमेश्वराचे दर्शन–

सारांश ,सृष्टीत सर्वत्र परमेश्वर  भरून राहिला आहे. डोळ्यांनी तो पाहण्याची सवय मात्र आपण लावून घेतली पाहिजे. दुर्जनांच्या ठिकाणाचा परमेश्वरही पाहता आला पाहिजे. राम  पटतो पण रावण ही  पटला पाहिजे . वेदात म्हटले आहे,”त्या दरोडेखोरांच्या नायकाला नमस्कार.त्या क्रूरांना,हिंसकाना नमस्कार. हे चोर,हे ठग ,हे दुष्ट हे सारे ब्रह्मच आहेत.सर्वाना नमस्कार. “