23 Oct 2022

अध्याय 13 – क्षेत्र – क्षेत्रज्ञ विभाग योग ( किंवा आत्मानात्म – विवेक)

सारांश :

कर्मयोगास उपकारक देहात्म -पृथक्करण: 

भूमिती मध्ये युक्लिड ने जशी तत्त्वे सांगून दिली ,सिद्धांत सांगून दिले ,त्याप्रमाणे जीवनाला उपयोगी अशी तत्त्वे व्यासा नी गीतेत सांगितली आहेत. विस्तार पसारा काही नाही. याचे मुख्य कारण असे की गीतेमध्ये ज्या वस्तू मांडल्या आहेत त्या पडताळून पाहणे प्रत्येकाला शक्य आहे. जीवनाला उपयुक्त जेवढ्या वस्तू ,तेवढ्याच वस्तू गीतेत सांगितल्या आहेत. 

आपण गीतेकडे पाहून राहिलो आहोत.त्यातील मुख्य उद्देश हाच कि जीवनात ज्या ज्या वेळी आपणास मदतीची आवश्यकता भासेल ,त्या त्या वेळी गीते पासून ती मिळावी.  गीता हे जीवनोपयोगी शास्त्र आहे. 

स्वधर्माचरण करणाऱ्याने फळाचा त्याग करावा ही प्रधान गोष्ट गीतेत सर्वत्र सांगितली आहे. कर्म करावे व त्याचे फळ टाकावे. झाडास पाणी घालावे,त्याला वाढवावे परंतु त्याच्या छायेची ,फळाची ,फुलांची स्वतः साठी अपेक्षा ठेऊ नये. असा हा स्वधर्माचरण रूप कर्म योग  आहे. 

फळ सोडावे हे सांगण्यास सोपे आहे पण आचरण्यास कठिण आहे. कारण कार्याला प्रेरक शक्ती हीच मुळी  फळ वासना मानलेली आहे.फळ वासना सोडून कर्म करणे हा उलटा पंथ आहे. म्हणूच तो कठीण आहे.लाखो कर्म करणाऱ्यांमध्ये, नुसते कर्मच नव्हे  तर स्वधर्माचरण रूप कर्म करणाऱ्या लाखो मध्ये ही ,गीतेतील कर्मयोग आचरणारा एखादाच सापडणार. कर्म करणे व त्याचे फळ सोडून देणे हे केवळ असामान्य काम आहे. 

फळ सोडून कर्म करण्याच्या पृथक्करणाला उपयोगी असे दुसरे महान पृथक्करण “ देह ( क्षेत्र ) आणि आत्मा ( क्षेत्रज्ञ )”यांचे ,या तेराव्या अध्यायात सांगितले आहे. 

प्रत्येक वस्तूच्या आत काय आहे ते आपण पहिले पाहिजे. फणसाला बाहेरून काटे असतात पण आत रसाळ गरे असतात. बाह्य देह आणि आतील आत्मा याप्रमाणे प्रत्येक वास्तूचे दुहेरी रूप आहे. कर्मा  मध्ये ही असेच. बाहेरचे फळ हा कर्माचा देह आहे.कर्मा  मुळे जी चित्त शुद्धी होते ती त्या कर्माचा आत्मा आहे. हरेक ठिकाणी देह अलग करावा व आत्म्याची पूजा करावी. 

सध्याच्या काळात ‘केवळ देह रूपी  मी आहे ‘ एवढेच शिकवले जाते. सर्व देहाचेच चोचले आहेत.या देहाची अशी वृथा  पूजा चालली आहे.आत्म्याच्या गोडीकडे लक्षच नाही.

देहात किंवा मनात असलेल्या दोषांची जाणीव असणे काही वाईट नाही.त्याने ते दोष दूर करण्यास मदत मिळते. परंतु, मी म्हणजे देह नव्हे हे स्पष्टपणे कळले पाहिजे. “मी” जो आहे तो या देह पासून अगदी भिन्न ,अत्यंत सुंदर,सोज्वळ,पवित्र,अव्यंग,असा आहे. देह हे एक मला मिळालेले साधन आहे हे लक्षात येईल तेव्हाच सुधारणा होईल.जसे शेतीचे अवजार तास हा देह. परमेश्वराच्या घरची शेती करण्याचे देह एक अवजार आहे. हे अवजार बिघडले तर त्यात सुधारणा केलीच पाहिजे.देह  हा साधन रूपाने उभा आहे.देहापासून अलग होऊन मी दोषापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी स्वामी आहे,मालक आहे,या देहाला राबवून घेणारा व त्याच्याकडून उत्तम काम करून घेणारा आहे. अशी वृत्ति आपण बाळगली पाहिजे. 

देहासक्ती मुळे जीवन अडगळीचे :  

मरणाची घडी आली की  एक क्षणही देह टिकवता येत नाही. मृत्यू पुढे माणसाची सर्व ऐट थांबते. हा मनुष्याचा देह मोठा किमती आहे. हे खरेच आहे. पण हा मनुष्याचा देह किमती कशाने ठरला?

काही लोक आपला देह बचावण्यासाठी मांस खातात . पशूचा देह म्हणे कमी किमतीचा. का रे बाबा?

वाघ,सिंह हे पशु वाटेल त्याला खातात. स्वार्थाशिवाय विचारच करत नाहीत.तसे मनुष्य करीत नाही. मनुष्य आपल्या सभोवतीच्या सृष्टीचे संरक्षण करतो,म्हणून मनुष्याचा देह मोलाचा.

ज्या कारणाने मनुष्य देह मोलाचा ठरला, ते कारणच मांसाहार करून तू खोडुन  टाकतो आहेस !  भल्या माणसा ,तू सयंमाने राहतोस ,सर्व जीवांसाठी झटतोस,सर्वांचा सांभाळ करण्याची वृत्ती तुझ्या ठिकाणी आहे,म्हणून तू पशूंपेक्षा श्रेष्ठ आहेस.म्हणूनच मानव देह दुर्लभ म्हटला  आहे. 

सामान्य पशु अन्य जीवांचे मांस खाण्याची जी क्रिया करतो तीच क्रिया करण्यास मनुष्य जेव्हा निःशंकपणे उद्युक्त होतो तेव्हा त्याच्या मोठे पणाचा आधारच काढून घेतल्यासारखे होते. ज्या फांदीवर मी बसलो आहे तीच तोडण्याचा मी प्रयत्न करावा तसे हे आहे. 

हा देह माझ्या हातातील एक साधन आहे.ते साधन नीट ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करावयास हव्यात त्या मी कराव्या.

सारांश,देह हे साध्य नसून साधन आहे. ही बुद्धी दृढावली तर जीवन निराळेच भासू लागेल.मग या देहाला शृंगारण्यात त्याला कौतुक वाटणार नाही. मन शृंगारावें ,बुद्धीचा विकास करावा.हृदय सुंदर करावे.   

तत्त्वमसि :

भगवान या तेराव्या अध्यायात जो विचार सांगून राहिले आहेत तो फार मोलाचा आहे. “ तू देह नाहीस ,तू आत्मा आहेस” ,तत्त्वमसि – ते आत्मरूप तू आहेस. हे वरचे पांघरूण ,हे टरफल, तू नाहीस. ते निखळ अविनाशी फळ ,ते तू आहेस.” 

’ते तू आहेस’ हा विचार मनुष्याच्या अंतःकरणात स्फ़ुरेल,हा देह मी नाही ,तो परमात्मा मी आहे हा विचार मनात येईल,त्या क्षणी एक प्रकारचा अननुभूत आनंद मनात निर्माण होईल. त्या माझ्या रूपाचा नाश करणे या सृष्टीतील कोणत्याही वस्तूला शक्य नाही. ते सामर्थ्य कोणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार त्या उद्गारात भरलेला आहे. 

देहाच्या पलीकडचे अविनाशी निष्कलंक आत्मतत्त्व ते मी आहे. त्या आत्मतत्त्वासाठी हा देह मला मिळाला आहे. कामासाठी या देहाचा उपयोग आहे. ज्या वेळेस हा देह काम देईनासा होईल त्या वेळेस तो फेकून देण्यास मला प्रत्यवाय नाही. 

परमात्म – शक्तीवर विश्वास :

जो पर्यंत देहाची आसक्ती आहे ,भीती आहे तो पर्यंत खरे रक्षण मिळणार नाही. साप येईल मला चावेल किंवा चोर येईल व माझे सर्व लुटून नेईल अशी सारखी भीती  वाटत राहते.मग झोपेत तुझा बचाव कोण करणार?

मी  कोणत्या तरी शक्तीवर विश्वास ठेऊन निजतो. ज्या शक्तीवर विसंबून वाघ, गाई इत्यादी सर्व निजतात ,त्याच शक्तीवर विसंबून मीही झोपतो. आईच्या मांडीवर बालक सुखाने झोपतो.तो बालक त्या वेळेस जणू दुनियेचा बादशाह असतो. ह्या विश्वंभर-मातेच्या मांडीवर तुम्ही आम्हीही असेच प्रेमपूर्वक,विश्वासपूर्वक आणि ज्ञानपूर्वक निजण्यास शिकले पाहिजे.ह्या शक्ती बद्दल मला जितकी खात्री पटेल तितके माझे रक्षण अधिक होईल. जसजसा ह्या शक्तीचा अनुभव येत जाईल तसतसा विकास होईल.   

परमात्म – शक्तीचा उत्तरोत्तर अनुभव: उपद्रष्टा ,अनुमन्ता ,भर्ता आणि  भोक्ता 

जोपर्यंत देहात असलेल्या आत्म्याचा विचारच नसतो तो पर्यंत मनुष्य सामान्य क्रियांतच  गुरफटलेला असतो.भूक लागली म्हणजे खावे,तहान लागली म्हणजे पाणी प्यावे. झोप आली म्हणजे निजावे. या पेक्षा जास्त त्याला काही माहित नसते. ह्या वेळेपर्यंत आत्मा फक्त पाहत असतो. विहिरीकडे रांगत  जाणाऱ्या लहान लेकराच्या पाळतीवर जशी पाठीमागे आई उभी असते,त्या प्रमाणत आत्मा उभा असतो. शांतपणे तो सर्व क्रिया पाहतो. या स्तुतीला “उपद्रष्टा” असे म्हटले आहे. 

आत्मा पाहतो पण अजून संमति देत नसतो. परंतु मनुष्य मग पुढे जागा होतो. आपण पशु सारखे जगत आहोत याची त्याला जाणीव होऊ लागते.तो विवेक करू लागतो. स्वैर क्रिया थांबतात. स्वच्छंद जाऊन संयम येतो. या नैतिक भूमिकेवर जीव आला की आत्मा स्वस्थ बसून राहत नाही. तो आतून अनुमोदन देतो. “ शाब्बास “ असा धन्यतेचा आवाज आतून येतो. आता आत्मा केवळ उपद्रष्टा न राहता “ अनुमंता “ होतो. 

या पुढची भूमिका अशी. नैतिक जीवनात कर्तव्य करीत असताना मनाचे सारे मळ धुवून काढताना मनुष्य थकतो.”देवा माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाली ,मला अधिक शक्ती दे ,अधिक बळ दे” अशी प्रार्थना करू लागतो.प्रार्थने चे स्वारस्य समजू लागते.आर्त होऊन देवाचा धावा  तो करू लागतो.आता मात्र परमात्मा जवळ येतो. सहाय्य करावयास धावतो.या स्थितीला “ भर्ता “ असे नाव आहे. अशा स्थितीला  परमात्मा रोहिदासाची  चामडी धुईल, सजन कसायाचे मांस विकील ,कबीराचे शेले विणील ,जनाबाईचे दालन दळील.  

याच्या पुढची पायरी म्हणजे परमेश्वराच्या कृपेने जे फळ मिळाले ते पण आपण ना घेता देवाला दिले पाहिजे. भक्त सारा फळ लाभ ( आयुष्याची कमाई ) जेव्हा ईश्वरार्पण करतो. उपद्रष्टा ,अनुमन्ता ,भर्ता अशा स्वरूपात प्रतीत होणारा तो परमात्मा आता “ भोक्ता” होतो. शरीरात तो परमात्माच भोग भोगून राहिला आहे ,अशा भूमिकेवर जीव चढतो. 

या नंतर मात्र मनुष्य सारा भार देवावरच टाकतो. त्याला जे करायचे ते करू दे असे तो म्हणतो.अशा प्रकारे जीवनाची सर्व चाळवाचाळव ,नाचवानाचव,फुलवाफुलाव करणारा सर्वकाही परमेश्वरच शेवटी होतो. सारे जीवन ईश्वरमय होते. फक्त हा देहाचा पडदा मात्र राहतो. तो उडून गेला म्हणजे जीव व शिव ,आत्मा व परमात्मा ,एकाच होतात. 

कर्म योग आणि भक्ती योग या दोन पंखानी उडत साधकाने अशी ही  शेवटची  मजल गाठायची. 

नम्रता ,निर्दमभता इत्यादी मूलभूत ज्ञान-साधना : 

हे सारे करावयास नैतिक साधनेचा खंबीर पाया पाहिजे.सत्य असत्य यांचा विवेक करून सत्य घ्यायचे. सारासार पाहून सार  घ्यायचे.देह आणि आत्मा यांचे हे पृथक्करण सत्यासत्य विवेकाखेरीज शक्य नाही. हा विवेक ,हे ज्ञान अंगी बाणले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण ‘जाणणे ‘ असा करतो. परंतु केवळ ‘बुद्धीने जाणणे’ म्हणजे ज्ञान नव्हे.तोंडात बोकाणा भरला एवढ्याने जेवण होत नाही. तोंडातून ते चर्वण करून गळी  उतरले पाहिजे.तेथून ते पोटात गेले पाहिजे. तेथे ते पचून त्याचा रस झाला पाहिजे. त्या पासून रक्त रूपाने सर्व शरीरास पुष्टी मिळाली पाहिजे. असे झाले तर ते खरे जेवण.

त्याच प्रमाणे बुद्धीने जाणून भागात नाही. ते ज्ञान जाणून जीवनात भिनले पाहिजे,हृदयात मुरले पाहिजे.ते ज्ञान हात, पाय,डोळे यातून प्रकट झाले पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये विचारपूर्वकच कर्मे करीत आहेत असे झाले पाहिजे. 

या तेराव्या अध्यायात भगवंतांनी स्थितप्रज्ञाच्या लक्षणांप्रमाणेच   ही  ज्ञानाची लक्षणे दिली आहेत. ‘नम्रता ,दंभ-शून्यत्व,अहिंसा,ऋजुता,क्षमा इत्यादी  वीस गुण भगवंतांनी दिले आहेत. या लक्षणांचे ( गुणांचे) पाचच श्लोक गीतेत ( श्लोक ७ ते ११) आहेत.ते समजून आपल्या आचरणात आणावेत. 

असो,तर उत्तरोत्तर विकास करून घेत आत्म्यापासून देह अलग करीत,सर्वानी सारे जीवन परमेश्वरमय करण्याचा प्रयत्न करावा.