अध्याय 17 -परिशिष्ट 2. साधकाचा कार्यक्रम
सारांश :
सुबद्ध वर्तनाने वृत्ती मोकळी राहते
आज सतराव्या अध्यायात दुसरे परिशिष्ट पहावयाचे आहे. या अध्यायात कार्यक्रम-योग सांगितला आहे असे एका दृष्टीने म्हणता येईल.गीता या अध्यायात रोजचा कार्यक्रम सुचवीत आहे.
आपली वृत्ती प्रसन्न व मोकळी राहावी असे वाटत असेल तर आपण आपले वर्तन बांधून घेतले पाहिजे.ज्ञानी पुरुषाचे उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊया. सूर्य हा ज्ञानी पुरुषांचा आचार्य आहे. भगवंतांनी प्रथम कर्मयोग सूर्यास शिकविला व सूर्यापासून मनूस,म्हणजे विचार करणाऱ्या मनुष्यास प्राप्त झाला. सूर्य स्वतंत्र व मोकळा आहे. तो नियमित आहे यातच त्याच्या स्वातंत्र्याचे सार आहे. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे की ठराविक रस्त्याने फिरावयास जाण्याची जर आपणास सवय असेल तर रस्त्याकडे लक्ष न देता मनाने आपणास विचार करीत फिरता येते. रोज नवीन रास्ता जर काढू तर सारे लक्ष त्या मार्गाकडे द्यावे लागेल.मनाला मग मोकळीक राहणार नाही. सारांश,जीवनाचा बोजा न वाटता जीवनात आनंद वाटावा ,यासाठी आपण वर्तन बांधून घेतले पाहिजे.
यासाठी या सतराव्या अध्यायात भगवान कार्यक्रम सांगून राहिले आहेत. आपण जन्मताच तीन संस्था बरोबर घेऊन जन्मतो. या तीन संस्थांचे कार्य मनुष्याने उत्तम रीतीने चालवून संसार सुखमय करावा यासाठी गीता कार्यक्रम सांगत आहे. कोणत्या या तीन संस्था ?आपल्या भोवती गुंडाळलेले हे शरीर ही एक संस्था;आपल्या आसपास पसरलेले हे ब्रह्माण्ड ,ही अपार सृष्टी , जिचा आपण एक अंश आहोत, ती दुसरी संस्था; आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो तो समाज ,आपल्या जन्माची वाट पाहत असलेले ते आई बाप ,बहीण भाऊ,आसपासचे शेजारीपाजारी ,ही तिसरी संस्था. या तिन्ही संस्था आपण रोज वापरतो ,झिजवतो. गीतेची अशी इच्छा आहे की ,या संस्थांची आपल्यासाठी जी झीज होते ती भरून काढण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा व जीवन सफल करावे. अहंकार दूर ठेऊन या संस्थांसंबंधीचे हे जन्म प्राप्त कर्तव्य आपण केले पाहिजे.
हे कर्तव्य करण्याची योजना कोणती? यज्ञ,दान व तप या तिहींनी मिळून ही योजना होते. हे शब्द आपल्या परिचयाचे असले तरी त्यातील अर्थ आपणास नीट समाजात नसतो.
त्या साठी त्रिविध क्रिया योग
हा अर्थ समजण्यासाठी साठी प्रथम यज्ञ म्हणजे काय ते पाहू.सृष्टीची जी झीज होते ती भरून काढणे म्हणजे यज्ञ. झीज भरून काढणे हा यज्ञातील एक हेतू. दुसरा हेतू म्हणजे वापरलेल्या वस्तूंचे शुद्धीकरण करणे. आपण विहीर वापरतो. आजूबाजूस घाण होते.पाणी साचते.विहिरीजवळची ही सृष्टी बिघडली ,ती शुद्ध करावयाची. तेथील पाणी काढून टाकावयाचे.चिखल दूर करावयाचा.झीज भरून काढणे,शुद्धी करणे या गोष्टी बरोबरच प्रत्यक्ष काही निर्माण करावयाचे ही तिसरी गोष्टही यज्ञात आहे.कापूस पिकवणे,धान्य निर्माण करणे,सूत कातणे या ही यज्ञ क्रियाच आहेत.हा परोपकार नाही. आपण आधीच ऋणी आहोत. हे ऋण फेडण्यासाठी जी निर्मिती करावयाची तो यज्ञ म्हणजे सेवा आहे.
दुसरी संस्था म्हणजे मनुष्य-समाज . आई,बाप,गुरु ,मित्र हे आपल्यासाठी मेहनत करीत असतात. हे समाजाचे ऋण फेडण्यासाठी दान सांगितले आहे. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जी सेवा करावयाची ती सेवा म्हणजेच दान.मनुष्याला पुढे जाण्यासाठी जी मदत करणे ती म्हणजे दान.
तिसरी संस्था म्हणजे आपले शरीर. शरीराचीही दिवसेंदिवस झीज होते. आपण मन,बुद्धी,इंद्रिये या सर्वाना वापरतो,झिजवतो. या शरीरात जे विचार होतात किंवा दोष उत्पन्न होतात ,त्यांच्या शुद्धी साठी तप सांगितले.अशा तऱ्हेने सृष्टी,समाज व शरीर या तिन्ही संस्थांचे काम उत्कृष्ट चालेल असे वागणे हे आपले कर्तव्य आहे.
आपण यज्ञ ,दान,तप यातील भेद पहिला. परंतु या सर्वाना व्यापक अर्थाने यज्ञच म्हणता येईल.गीतेने चौथ्या अध्यायात द्रव्य यज्ञ,तपो यज्ञ इत्यादी सांगितले आहेत.गीतेने यज्ञाचा अर्थ विशाल केला आहे.
या तिन्ही संस्थांसाठी जी जी सेवा करू ,ती सेवा यज्ञरूपच असणार.ती सेवा निरपेक्ष असली म्हणजे झाले.
ही जी सेवा करायची ,त्यासाठी काही भोगही घ्यावा लागेल.भोग ही यज्ञाचेच एक अंग आहे. या भोगाला गीता आहार म्हणते.हा आहार जरी स्वतः यज्ञ नसला तरी यज्ञ सिद्ध होण्याचे ते एक अंग आहे. म्हणून ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ‘ असे आपण म्हणतो.
या सर्व गोष्टींच्या मुळाशी पुन्हा श्रद्धा हवी. सर्व सेवा परमेश्वरार्पण करावयाची हा भाव हवा.
साधनेचे सात्त्विकीकरण
आपली सर्व कर्मे जेव्हा सात्त्विक होतील तेव्हाच ती देवास अर्पण करता येतील. यज्ञ,दान,तप सर्व सात्त्विक पाहिजेत.यज्ञ सात्त्विक होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे. निष्फलतेचा अभाव व सकामातेचा अभाव या दोन्ही गोष्टी यज्ञात असाव्यात. यज्ञामध्ये जर सकामता असेल तर तो राजस यज्ञ होईल.निष्फलता असेल तर तो तामस यज्ञ होईल.
अशा रीतीने निष्कामता अंगी बाळगून विधिपूर्वक यशस्वी कर्म हातून होईल,तेव्हाच चित्त शुद्धी होऊ लागेल. चित्तशुद्धीची कोणती कसोटी? बाहेरचे काम तपासून पाहावे. ते जर निर्मल व सुंदर नसेल तर चित्तही मालिन समजण्यास हरकत नाही.आपली सारी कर्मे म्हणजे आपल्या मनाच्या मूर्ती होत. मन सुंदर असेल तर त्या कर्ममय मूर्तीही सुंदर होतील. बाहेरच्या कर्माची शुद्धी मनातील शुध्दिवरून व मनाची शुद्धी बाहेरच्या कर्मावरून पडताळून घ्यावी.
आणखी एक गोष्ट म्हणजे ह्या सर्व कर्मात मंत्र ही पाहिजे. मंत्रहीन कर्म व्यर्थ होय.सूत काढताना या सुताने मी गरीब जनतेशी जोडला जात आहे हा मंत्र हवा. हा मंत्र हृदयात नसेल आणि तासंतास क्रिया केलीत तरी ती व्यर्थ होय.
आहार-शुद्धी
अशी सेवा हातून घडावी म्हणून आहार शुद्धी ही हवी. जसा आहार तसे मन. आहार परिमित असावा. आहार कोणता असावा यापेक्षाही तो किती असावा हि वस्तू अधिक महत्त्वाची आहे.
आपणास कसे तरी जगायचे नाही. कसे तरी ज्याला जगायचे त्याचे काम सोपे आहे. पशु सुद्धा कसे तरी जगतात. जसे पशु तसे का आपण?
पशूंमध्ये व मनुष्यामध्ये फरक आहे. तो फरक वाढवणे यालाच संस्कृती वर्धन म्हणतात. आपल्या राष्ट्राने मांसाशन-त्यागाचा महान प्रयोग केला. तो पुढे न्या. निदान ज्या भूमिकेवर आहेत त्याच्या मागे तरी जाऊ नका.
अविरोधी जीवनाची गीतेची योजना
व्यक्ती व समाज यांत उत्तम सहकार्य ज्या योगे होईल असा साधा सुंदर मार्ग गीता दाखवीत आहे.
जीभ व पोट यांत विरोध का आहे? पोटाला पाहिजे तेवढेच अन्न जिभेने दिले पाहिजे.पोटाने पुरे म्हटले की जिभेने बंद केले पाहिजे. पोट ही एक संस्था .जीभ एक संस्था. या सर्व संस्थांचा मी सम्राट आहे. या सर्व संस्थांत अद्वैतच आहे. कोठून आणलात हा करंटा विरोध? एकाच देहातील या संस्थांत जसा वास्तविक विरोध नसून सहकार्य आहे ,त्या प्रमाणे समाजाचे ही आहे. समाजातील हे सहकार्य वाढावे म्हणून गीता चित्तशुद्धीपूर्वक यज्ञ-दान-तप क्रिया सांगत आहे. अशा कर्माने व्यक्ती व समाज दोहोंचे कल्याण साधेल.
समर्पणाचा मंत्र
यज्ञमय जीवन करून पुन्हा ते सारे ईश्वरार्पण करावयाचे असे गीतेचे आणखी सांगणे आहे. दिवसेंदिवस अधिक निष्काम ,अधिक निःस्वार्थ सेवा हातून घडत जावी असे इच्छित जावे. सेवा उत्तरोत्तर अधिक शुद्ध व्हावी अशी इच्छा असेल तर क्रियाजात ईश्वरार्पण करा.
पाप अपहारी हरिनाम
ईश्वराच्या कोणत्याही नामात असत्यातून सत्याकडे नेण्याची शक्ती असते. जीवनाची हळूहळू शुद्धी केली पाहिजे. परमात्मा अवश्य मदत करील, तुझ्या दुबळेपणात तुझा हात धरील.पुण्याचा अहंकार नको. पुण्याचा अहंकार पापरूप आहे.पाप तेवढे पाप नाही,जेवढा पुण्याचा अहंकार पापरूप आहे.
‘बहू भितो जाणपणा ,आड न यो नारायणा ‘ असे तुकारामांनी म्हटले आहे. तो मोठेपणा नको.त्या पेक्षा पापी,दुःखी असलो तरी बरा. ‘जाणते लेकरू ,माता लागे दूर धरू’. जाणत्या लेकराला आई दूर ठेवील,परंतु अजाण मुलाला आई पोटाशी धरील.स्वावलंबी पुण्यवान होणे मला नको. परमेश्वरालंबी पापी असणे हेच मला प्रिय आहे.परमात्म्याचे पावित्र्य माझ्या पापाला पुरून उरण्यासारखे आहे. आपण पापे टाळण्याचा प्रयत्न करावा. ती टाळता नाही आली तर हृदय रडेल, मन तडफडेल ,मग परमेश्वराची आठवण होईल. तो कौतुक पाहत उभा आहे. त्याला म्हणा,”मी पापी आहे व म्हणून तुझ्या दारी आलो आहे. “ पुण्यवानाला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे ,कारण तो पुण्यवान आहे. पाप्याला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे ,कारण तो पापी आहे.