15 Oct 2022

अध्याय 9 – राजविद्याराजगुह्ययोग ( मानव सेवेची राजविद्या : समर्पण योग )

सारांश :

प्रत्यक्ष अनुभवाची विद्या –

हरिनामाची अपूर्व थोरवी या नवव्या अध्यायात सांगितली आहे. अनेक कारणांनी या नवव्या अध्यायाला पावनत्व आले आहे. हा अध्याय गीतेच्या मध्यावर उभा आहे. ज्ञानदेवांनी शेवटी जेव्हा समाधी घेतली ,त्या वेळेस हा अध्याय जपत ते समाधिस्त झाले असे म्हणतात. 

राजविद्या ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. भगवान तिला ‘प्रत्यक्षावगम ‘ म्हणत आहेत. शब्दात न मावणारी परंतु प्रत्यक्ष अनुभवाच्या कसावार कसलेली अशी गोष्ट या अध्यायात सांगितली असल्यामुळे त्यास फार गोडी आली आहे. प्रत्यक्षात याच देही याच डोळा अनुभवास येणारे फळ ,जिवंतपणे अनुभवास येणाऱ्या गोष्टी या अध्यायात सांगितल्या आहेत. गुळ  खाताना त्याची गोडी प्रत्यक्ष समजते. त्याच प्रमाणे रामाचे गुलाम होऊन राहण्यातील  गोडी येथे आहे. अशी ही  मर्त्य लोकींच्या जीवनातील गोडी प्रत्यक्षात आणून देणारी राज-विद्या या अध्यायात आहे.ती राज-विद्या गूढ आहे. परंतु भगवान सर्वांसाठी ती सुलभ करून ठेवत आहेत.  

सोपा मार्ग –

ज्या धर्माचे गीता सार आहे,त्या धर्माला वैदिक धर्म म्हणतात. वैदिक धर्म म्हणजे वेदांपासून निघालेला धर्म. वेद  हे पहिला ऐतिहासिक पुरावा मानले जातात .  असा हा वैदिक धर्म मोठा होता होता त्याचा वृक्ष झाला. शेवटी त्याला गीतेचे दिव्य मधुर फळ लागले.वेद  धर्माच्या  साराचेही सार म्हणजे ही  गीता. वेदांच्या कपाटात अडकलेला मोक्ष भगवंतानी राजमार्गावर आणून ठेवला.भगवंतांनी सांगितले,तुझे सारे रोजचे सेवा कर्म हेच यज्ञरूप  कर.म्हणजे मोक्ष साधेल. 

 हा राजमार्ग आहे. हा सोपा आहे. या मार्गाने धावत गेलात तरी पडणार नाहीत. दुसरा वैदिक मार्ग ,तलवारीची धारही बोथट वाटावी इतका बिकट आहे. 

ईश्वरच चराचरात प्रगट होऊन राहिला आहे. त्याला शोधण्याचे कृत्रिम उपाय कशाला?साधा उपाय आहे.तू जे काम करशील ते रामाशी जोड. रामाचा गुलाम हो. तो कठीण वेद मार्ग ,तो यज्ञ ,ती स्वाहा,ती स्वधा,ते श्राद्ध ,ते तर्पण सारे मोक्षाकडे नेईल ,परंतु अधिकारी – अनधिकारी भानगड तेथे उत्पन्न होते. आपल्याला नकोच ते. त्या पेक्षा हा सोपा मार्ग धर असे हा नववा अध्याय सांगतो.म्हणून हा मार्ग भक्तांना फार गोड वाटतो .  

 अधिकार भेदाची भानगड नाही–

मोक्षावर केवळ मानवांचाच हक्क नसून पशु पक्ष्यांचा ही आहे,ही गोष्ट श्रीकृष्णांनी स्पष्ट केली आहे. त्यांनी जीवनात ती गोष्ट गायी व घोडे यांच्या मार्फत अनुभवली आहे. जो भगवंतांचा अनुभव तोच व्यासांचा. कृष्ण व व्यास एकरूपच आहेत. दोघांच्या जीवनाचे सार एकाच. मोक्ष विद्वत्तेवर,कर्म कालापावर अवलंबून नाही. साधी भोळी भक्ती ही पुरे. भोळ्या भाविक स्त्रिया मी मी म्हणणाऱ्या ज्ञान्यास मागे टाकून पुढारी गेल्या आहेत. 

कर्म फळ देवाला अर्पण –

नवव्या अध्यायात कर्म योग आणि भक्ती योग यांचा मधुर मिलाप आहे. कर्म योग म्हणजे कर्म करायचे आणि फळाचा त्याग करावयाचा. कर्म अशा खुबीने करा की  फळाची वासना जडणार नाही. राज योग म्हणजे कर्म तर करावयाचे पण फळ टाकावयाचे नाही तर ते देवाला भावपूर्वक अर्पण करावयाचे. राज योग म्हणजे थोडक्यात कर्मयोग आणि भक्ती योग यांचे मधुर मिश्रण आहे अशी व्याख्या विनोबांनी केली आहे. 

विकार आणि इंद्रेयेही देवाला अर्पण–

मनात येणाऱ्या वासना आणि काम क्रोधादि विकारही देवाला द्यायचे. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली येथे सयंमाग्नित घालून जाळणे पोळणे  असे काही नाही. चट  अर्पण करून मोकळा हो. इंद्रिये दुश्मन नाहीत. ती चांगली आहेत. त्यांच्यात फार सामर्थ्य आहे. प्रत्येक इंद्रिय ईश्वरार्पण बुद्धीने वापरणे हा राजमार्ग आहे. हाच राजयोग . 

पापाचे भय नाही –

सत्याला पचविणारी ( झाकून ठेवणारी ) शक्ती जगात नाही. ईश्वरी नामासमोर पाप टिकूच नाही.  म्हणून ईश्वराला जोडा.त्याची कृपा प्राप्त करून घ्या. सर्व कर्मे त्याला अर्पण करा. त्याचे व्हा . सर्व कर्मांचा नैवेद्य प्रभूला अर्पण करावयाचा आहे, ही  भावना उत्तरोत्तर अधिक उत्कृष्ट करून चाललात म्हणजे क्षुद्र जीवन दिव्य होईल. मलिन जीवन सुंदर होईल.   

थोडे ही  गोड –

‘पत्रं , पुष्पं ,फलं ,तोयं ‘ काही ही असो.भक्ती असली म्हणजे पुरे.  किती दिलेत हा ही मुद्दा नाही. कोणत्या भावनेने दिलेत , हा मुद्दा आहे. 

सारांश ,जीवनातील साधी कर्मे,साध्याच क्रिया ,त्या परमेश्वराला द्या ;म्हणजे जीवनात सामर्थ्य येईल . मोक्ष हातास चढेल. कर्म करावयाचे आणि त्याचे फळ न टाकता ईश्वराला ते अर्पण करावयाचे असा हा राजयोग कर्म योगाच्याही पुढे पाऊल टाकतो.कर्म योग म्हणतो, ”कर्म करा व फळ टाका,फळाची आशा धरू नका . ” येथे, कर्म योग  संपला .

राज योग  म्हणतो,” कर्माची फळे टाकू नकोस . सर्व कर्मे देवाला वहा . ती फुले आहेत, पुढे नेणारी साधने आहेत. ती त्या मूर्तीवर वहा .एकीकडून कर्म,दुसरीकडून भक्ती , असा मेळ करून,जीवन सुंदर करीत चल. त्याग नको करू फळाचा. फळ फेकायचे नाही. तर ते देवाशी जोडायचे .”कर्म योगात तोडलेले फळ राजयोगात जोडले जाते. पेरले आणि फेकून दिले यात फरक आहे. पेरलेले थोडेही अनंत पटींनी भरभरून मिळाले. फेकलेले तसेच गेले. ईश्वराला जे कर्म अर्पण केले ते पेरले गेले.त्या मुळे जीवनात अपार आनंद भरेल . अपार पवित्रता येईल.