07 Oct 2022

अध्याय ५ -सारांश : दुहेरी अकर्मावस्था : योग आणि सन्यास

(१)बाह्य कर्म मनाचा आरसा :संसाराला अनेकदा समुद्राची उपमा देतात. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी .तसेच संसाराचे आहे. संसार सर्वत्र भरून राहिला आहे. 

पसारा सोडला ,व्याप कमी केला ,एवढ्याने संसार कमी झाला असे नाही . घरात बसा किंवा वनात बसा ,आसक्ती जवळच असते. संसार लेशमात्रही कमी होत नाही.दोन योगी हिमालयात जाऊन गुहांत जाऊन बसले तर तेथेही   परस्परांची कीर्ती एकमेकांच्या कानावर गेली तर ते जळफळू लागतील. स्वधर्म आचार करू लागलो एवढ्याने अलिप्तता येत नाही .कर्माची व्याप्ती कमी करणे म्हणजे अलिप्तता नव्हे. 

मग अलिप्तपणा कसा मिळवायचा?त्यासाठी मनापासून प्रयत्न करावयास हवेत.मनाच्या सहकाराशिवाय  कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही. साधन म्हणून बाह्य स्वधर्माचरण व आतून मनाचे विकर्म अशा दोन्ही गोष्टी हव्यात. बाह्य कर्मातून आपल्या मनाचे स्वरूप प्रकट होते ,म्हणून बाह्य कर्म हे मनाचा आरसा आहे. 

कर्म तुम्ही रागीट  अहात कि स्वार्थी अहात की आणखी कोणी अहात ते प्रकट करते. आरशात तोंड मळलेले दिसले तर आपण आरसा फोडत नाही. तोंड धुऊन येतो. तसेच कर्मा मुळे आपल्या मनातील खळमळ बाहेर पडते म्हणून काही आपण कर्म सोडावयाच नाही. कर्म करावयाचे आणि  मन निर्मळ ठेवण्याची खटपट करीत राहायचे. 

सारांश,आपल्या मनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कर्माचा फार उपयोग आहे.कर्मामुळे दोष दिसले कि मग ते दूर  करता येतात.दोष दूर करण्यासाठी विकर्माची  योजना करावयाची.विकर्म सहज झाले की त्याचे अकर्म होते. 

(२) अकर्म दशेचे स्वरूप:कर्माची सहजता समजण्यासाठी आपण एक नेहमीचे उदाहरण घेऊ. लहान मूल प्रथम चालावयास शिकते. त्या वेळेस त्याला खूप कष्ट पडतात. आपण त्याचे कौतुक करतो .आपण म्हणतो ,बाळ चालावयास लागला. ते चालणे पुढे  सहज होते. 

श्रमणे  हा मनाचा धर्म आहे.मन त्या त्या कर्मात गुंतलेले असेल तर श्रम कमी होतात.कर्मे सहज होऊ लागली म्हणजे त्यांचा बोजा वाटत नाही. कर्मे आनंदमय होतात. कर्म अकर्म होते.

कर्माचे अकर्म होणे हे आपले ध्येय आहे. या ध्येयासाठी स्वधर्मरूप कर्मे करावयाची. ती करत असताना दोष दिसतील. दोष दूर करण्यासाठी विकर्माची ची कास धरावयाची. असा अभ्यास करीत गेले म्हणजे कर्माचा यत्किंचितही त्रास होत नाही. हजारो कर्मे होत असतां मन निर्मळ व शांत राहते. भावार्थ एवढाच कि स्वधर्माचरणाची कर्मे विकर्माच्या साहाय्याने  निर्विकार करण्याची सवय होता होता ती स्वाभाविक होतात.मोठे मोठे प्रसंग पण मग कठीण वाटत नाहीत.कर्माचा अहंकारच नाहीसा होतो.काम क्रोधाचे वेग नष्ट  होतात.क्लेशांची जाणीव नाहीशी होते.कर्माचीही जाणीव उरात नाही.  

अकर्म दशेच्या  स्थितीचे  वर्णन करणे कठीण आहे .पण या स्थितीची कल्पना आणून देता येईल. उदा. सूर्य उगवतो .तो असे म्हणत नाही की  मी आता अंधार दूर करिन,पाखरांना उडायला लावीन,लोकांना कामे करायला प्रवृत्त करीन. तो उगवतो व तेथे उभा राहतो. त्याचे अस्तित्त्व विश्वाला चालना देते. सूर्य सहजपणे अकर्म करीत राहतो. तो म्हणतो,” प्रकाश हा माझा सहज धर्म आहे.प्रकाश देण्याच्या क्रियेचे मला कष्ट होत नाहीत. मी काही करीत आहे असे मला वाटत नाही.”सूर्याचे हे प्रकाशदान स्वाभीक आहे,तसेच संतांचे असते. त्यांचे जगणे म्हणजेच मुळी प्रकाश देणे. तुम्ही ज्ञानी पुरुषाला जर म्हणाल ,” तुम्ही महान सत्यवादी आहात” तर तो  म्हणेल ‘“ मी सत्याने चालणार नाही तर मी दुसरे करू तरी काय?”

ज्ञानी पुरुषाला सत्कर्मे सहज होतात.किलबिल करणे हा पाखरांचा सहज धर्म आहे .त्याचप्रमाणे ईश्वराचे स्मरण होणे हा संतांचा सहज धर्म होतो. खरे बोलणे ,भूतमात्री दया,कोणाचे उणे न पाहणे ,सर्वांची शुश्रूषा करणे वगैरे सत्पुरुषांचे कर्म सहज चाललेले असते. 

खाणे,पिणे ,झोपणे हे जशी सांसारिकाची सहजकर्मे तशीच सेवाकर्मे ही  ज्ञान्याची सहजकर्मे होत. ज्ञानी पुरुषाची कर्मे अकर्म दशेला आली कि या दशेलाच सन्यास ही पवित्र पदवी दिलेली आहे. या दशेलाच कर्मयोगही  म्हणावे.कर्म करीत असतो म्हणून तो योग परंतु करून ही काही केल्यासारखे वाटत नाही म्हणून तो सन्यास.म्हणून अकर्माची एक बाजू योग  आहे तर दुसरी बाजू संन्यास आहे.असे हे दुहेरी स्वरूप आहे.पाचव्या अध्यायात संन्यासाच्या दोन तऱ्हांची  तुलना केलेली आहे. एक चोवीस तास कर्म करूनही काहीच करत नाही व दुसरा क्षणभर हि कर्म न करता सर्व करतो.     

(३) भूमितीचा आणि मीमांसकांचा दृष्टांत : भूमितीत म्हणतात ‘समजा ‘ अ ब ‘ ही  रेखा आहे. रेखेची व्याख्याच अशी की तिला लांबी आहे पण रुंदी नाही. पण रुंदी नसलेली रेखा फळ्यावर काढणार कशी?त्या रेखेला थोडी तरी रुंदी राहणारच.त्यामुळे थोडीशी रुंदी असलेल्या त्या रेखेला ‘समजा’ असे मानावे लागते व त्या नंतरच पुढील प्रमेय सिद्ध करता येते. 

भूमितीत जसे आपण ‘मानतो’ तसेच भक्ती शास्त्र म्हणते कि माना ,या शाळीग्रामात ( काळ्या लंबवर्तुळाकार दगडात ) परमेश्वर माना. शाळीग्रामावर घाव घातला तर तो दगड फुटेल . परमेश्वर तर तुटत फुटत नाही. भूमितीत जर ‘माना ’ चालते ,तसेच भक्तिशास्त्रात का चालू नये?

(४) संन्यासी आणि योगी एकच: भगवान सांगतात ,’एकं सांख्यन्  च योगन् च यः पश्यति स पश्यति ‘.सन्यास व योग यांच्या ठिकाणी जो एकरूपता पाहील तोच खरे रहस्य समजला. सांख्य न करून सर्व करतो आणि योगी सर्व कर्मे करून काहीच करत नाही.इतके जरी असले तरी ,पुन्हा भगवान सांगतात ‘विशेष चि परी योग  संन्यासाहूनि मानिला ‘. दोन्ही सारखेच,मग भगवान असे का म्हणतात ? 

कर्मयोग श्रेष्ठ आहे असे जेव्हा भगवान म्हणतात ,तेव्हा ते साधकाच्या दृष्टीने म्हणतात . मुळीच कर्म न करता सर्व कर्म करण्याची तऱ्हा सिद्धालाच शक्य आहे, साधकाला नाही. परंतु सर्व कर्मे करून काही न करणे ,या तऱ्हेचे थोडे तरी अनुकरण करण्यासारखे आहे .साधकाला कर्मयोग मार्गही आहे आणि मुक्काम पण आहे.परंतु संन्यास हा मुक्कामावरच  आहे. म्हणून साधकाच्या दृष्टीने संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ होय.

याच न्यायाने भगवंतानी पुढे बाराव्या अध्यायात निर्गुणा पेक्षा सगुण विशेष मानले आहे.देहधारी मनुष्याला सुलभतेच्या दृष्टीने निर्गुण पेक्षा सगुण श्रेष्ठ आहे.

संन्यास व कर्मयोग ,पूर्ण रूपात दोहोंची किंमत सारखीच , परंतु कर्मयोगाला शिवाय वरती व्यावहारिक किंमत आहे. कर्मयोग हा मार्गावरही आहे आणि मुक्कामावरही आहे .परंतु संन्यास फक्त मुक्कामावरच आहे ,मार्गात नाही.