07 Oct 2022

अध्याय 3 कर्म योग (निःस्वार्थ आणि इच्छारहित कृतीचा योग)

१. फल त्यागी अनंत फळ मिळवितो – मित्रानो ,दुसऱ्या अध्यायात आपण संपूर्ण जीवनशास्त्र पाहिले . तिसऱ्या अध्यायात याच जीवन शास्त्राचे स्पष्टीकरण आहे. कर्मयोगात फल त्याग हा  महत्त्वाचा आहे. आता प्रश्न असा की कर्मयोगात फल त्याग आहे,पण मग फळ मिळते की नाही? तिसरा अध्याय सांगतो , कर्माच्या फळाचा त्याग केल्याने कर्मयोगी अनंत पट फळ मिळवितो. 

सामान्य मनुष्य आपल्या फळा भोवती कुंपण घालतो. अनंत मिळणारे फळ अशामुळे तो गमावून बसतो. सांसारिक मनुष्य अपार कर्म करून अल्प फळ मिळवितो, आणि कर्मयोगी थोडेसे कर्म करूनही अनंतपट मिळवितो.हा फरक केवळ एका भावनेने होतो. 

सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते; परंतु ती क्षुद्र फळासाठी असते. जशी वासना तसे फळ. आपल्या वस्तूची जी आपण किंमत करू, तिच्यापेक्षा त्या वस्तूची अधिक किंमत जगात होत नसते. कर्मा मागील भावनेने त्याचे मोल ,सामर्थ्य वाढते. नोटेची किंमत किती?नोटेवर शिक्का असतो.त्या शिक्क्यामुळे तिची किंमत.

कर्म तेच .परंतु भावना भेदामुळे अंतर पडते.परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासाक होते.संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक ठरते. कर्मयोगी शेतकरी शेती स्वधर्म म्हणून आचरील.त्यामुळे त्याच्या पोटाला तर मिळेलच,पारंतू पोटाला मिळेल म्हणून तो कर्म करीत नाही. शेती करता यावी म्हणून खाणे तो साधन मानील. स्वधर्म हे त्याचे साध्य व खाणे  हे साधन. परंतु दुसऱ्या  शेतकऱ्याच्या बाबतीत पोटाला मिळणे हे साध्य  व शेतकीचा स्वधर्म हे साधन होईल. अशी ही उलटापालट आहे.  

सांसारिक आणि कर्मयोगी दोघांची कर्मे तीच परंतु कर्मयोगी फलासक्ती सोडून कर्मातच रमतो ही मुख्य गोष्ट आहे.सांसारिक प्रमाणे योगी ही खाली,झोप घेईल परंतु त्या संबंधीची त्याची भावना निराळी राहील.

कर्मयोग्याचे कर्म त्याला विश्वाशी समरस करीत असते.उदा. तुळशीच्या झाडाला पाणी घातल्या शिवाय जेवावयाचे नाही.वनस्पती सृष्टीशी जोडलेला हा प्रेम संबंध आहे. तुळशीला उपाशी  ठेऊन मी का आधी  जेऊ? गाईशी एकरूपता ,वृक्ष-वनस्पतींशी एकरूपता असे करत करत विश्वाशी एकरूपता अनुभवायची.                  

२. कर्मयोगाचे  विविध फायदे  – स्वधर्माचरण करणाऱ्या कर्मयोग्याची शरीर यात्रा तर चालतेच, परंतु नेहमी उद्योगात असल्यामुळे शरीर निरोगी व स्वच्छ राहते. त्याच्या त्या कर्मामुळे ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचाही योगक्षेम नीट चालतो. कर्मयोगी शेतकरी पैसे अधिक  मिळतील म्हणून अफू व तंबाखू पेरणार नाही. स्वतःचे ते कर्म तो समाजाच्या मंगलाशी जोडीत असतो.स्वतःला विसरून आजूबाजूच्या समाजाशी समरस होणारे असे कर्मयोगी ज्या समाजात निपजतात त्या समाजात सुव्यवस्था ,समृद्धी आणि सौमनस्य राहते. 

कर्मयोग्याच्या कर्मामुळे त्याचा देह आणि बुद्धी सतेज राहतात. या दोन फळांशिवाय चित्त शुद्धीचे  महान फळ त्याला मिळते. ‘कर्मणा शुध्दि:’ असे म्हटले आहे. कर्म चित्त शुद्धीचे साधन आहे. उदा. शेतातील माजलेले तण उपटता उपटता हृदयातील वासना विकाराचे तण उपटण्याची कर्मयोग्याला बुद्धी होते. महाभारतातील ‘तुलाधार वैश्य ’ किंवा संत गोरा कुंभार  अश्या कर्म योग्यांना त्या त्या धंद्यातील भाषेतूनच भव्य ज्ञान प्राप्त झाले.ती कर्मे म्हणजे त्यांच्या अध्यात्म शाळा होत्या. ती त्यांची कर्मे उपासनामय ,सेवामय होती.ती दिसावयास व्यावहारिक  परंतु अंतरी आध्यात्मिक होती.   

कर्मयोगी स्वयं तृप्त असतो.तरीही कर्म केल्याशिवाय राहत नाही.संत तुकाराम म्हणतात, “भजनाने देव मिळाला म्हणून का भजन सोडू?भजन आता आमचा सहज-धर्म झाला.”

“ आधी होता संतसंग I तुका झाला पांडुरंग 

   त्याचे भजन राहीना I मूळ स्वभाव जाईना II “  

कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले;परंतु कर्मयोगी शिखर गाठल्यावरहि ही शिडी सोडत नाही.सामान्य माणसा प्रमाणेच कर्मयोगी कर्म करत राहतो.कर्माची जाहिरात द्यायची नसते.  

३. कर्मयोग व्रतातील अडचणी  – कर्मयोग्याचे कर्म इतरांपेक्षा उत्कृष्ट असले पाहिजे. कर्म हीच उपासना. कर्मयोगी उत्कृष्ट कर्म करून परमेश्वराला अर्पण करतो.तो त्याच्या कामाची किंमत करत नाही. 

आपल्यामध्ये परमार्थाच्या वेडगळ कल्पना उत्पन्न झाल्या आहेत. जो परमार्थी आहे त्याने हात पाय हालवायचे नाहीत,कामधाम करावयाचे नाही ,असे लोकांना वाटते. जो शेती करतो ,खादी विणतो तो कसला परमार्थी असे विचारतात.

कर्मयोग्याचा परमेश्वर तर खरारा करीत उभा आहे. तो रानात गाई चरावयास नेतो. असा हा घोडे खाजविणारा ,गाई चारणारा ,रथ हाकणारा कर्मयोगी परमेश्वर संतांनी उभा केला आहे.संतही कोणी शिंपीकाम( नामदेव) ,कुंभारकाम(गोरा कुंभार) ,विणकाम( कबीर)  ,माळीकाम(सावता  माळी) ,दळण्याचे काम ( जनाबाई) आणि न्हाव्याचे काम (सेना न्हावी)  असे आपापले काम करीत मुक्त झाले आहेत. 

अशा या दिव्य कर्मयोगाच्या व्रतापासून मनुष्य दोन कारणांनी ढळतो. इंद्रिये मनुष्याला विचलित करतात. राग-द्वेष ,काम-क्रोध इत्यादी विकारांपासून दूर राहण्याची सूचना अध्यायाचे अंती भगवान देत आहेत. स्थितप्रज्ञ ज्या प्रमाणे संयमाची मूर्ति, त्याप्रमाणेच कर्मयोगी माणसाने बनले पाहिजे.