06 Nov 2022

अध्याय 15 – पुरुषोत्तम  योग (सर्वत्र पुरुषोत्तम-दर्शन)

सारांश :

प्रयत्न मार्गाहून भक्ति वेगळी नाही  : 

आज आपण एका अर्थाने गीतेच्या टोकाला आलो आहोत. पंधराव्या अध्यायात सर्व विचारांची परिपूर्णता झाली आहे. सोळावा ,सतरावा अध्याय हे परिशिष्ट रूप आहेत. अठराव्यात उपसंहार आहे.म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या अखेरीस  ‘शास्त्र’ ही  संज्ञा या अध्यायाला दिली. ”इति गुह्यतमं शास्त्रं इदमुक्तं मयानघ“ असे भगवान शेवटी म्हणत आहेत.

आता पर्यंत जीवनाचे जे शास्त्र ,जे सिद्धांत सांगितले त्याची पूर्णता या अध्यायात केली आहे.या अध्यायात परमार्थ पुरा झाला. वेदांचे सारे सार यात येऊन गेले.परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे ,हेच वेदांचे काम. ते या अध्यायात आहे ,म्हणून याला ‘वेदांचे सार’ अशी गौरवाची पदवी मिळालेली आहे. 

तेराव्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता पाहिली. चौदाव्यात तत्सबंधी थोडा प्रयत्नवाद तपासाला.परंतु भक्तिमार्ग म्हणजे प्रयत्न मार्गाहून काही वेगळा नाही. ही  गोष्ट सुचवण्यासाठी या पंधराव्या अध्यायाच्या आरंभीच संसाराला एका महान वृक्षाची उपमा दिली आहे.त्रिगुणांनी पोसलेल्या प्रचंड खांद्या  या वृक्षाला आहेत . अनासक्ती आणि वैराग्य या शस्त्रांनी हा वृक्ष छेदावा  असे आरंभीच सांगितले.        

भक्तीने प्रयत्न सुकर होतो 

जीवनाचे तुकडे आपण करू शकत नाही. कर्म ,ज्ञान व भक्ती ही  आपण निराळी करू शकत नाही व ती निराळी        नाहीतही.ज्ञान ,भक्ती व कर्म हे जीवनाचे तीन पाय आहेत. या तीन खांबांवर  जीवनाची द्वारका उभारायची. हे तीन पाय मिळून एकाच वस्तू तयार होते. तर्काने तुम्ही भक्ती-ज्ञान-कर्म अलग माना पण प्रत्यक्षात त्यांना अलग करता येणार नाही.एखादे काम करताना ते कसे करावयाचे त्याचे ‘ज्ञान’ हवे. आणि ते काम ज्याच्यासाठी करतो त्याच्याबद्दल प्रेम( भक्ती) हवे,तरच ते काम श्रेष्ठ होते. 

भक्ती मार्ग सोपा या म्हणण्याचा रोख काय? याचा रोख असा की भक्तीमुळे कर्माचा बोजा वाटत नाही. कर्माचे काठिण्य जाते. कितीही काम केले तरी न केल्यासारखे वाटते. 

भक्ती मार्गाने साधनेला सुलभता येते, परंतु आत्मज्ञानाशिवाय  त्रिगुणांच्या पलीकडे कायमचे जाण्याची आशा नाही. तर मग आत्मज्ञानाला साधन कोणते? सत्व सातत्त्याने सत्वगुण अंगी पचवून त्याचा अहंकार व त्याच्या फळाची आसक्ती जिंकण्याचा भक्तीचे प्रयत्न हेच ते साधन.  

सेवेची त्रिपुटी : सेव्य ,सेवक ,सेवा साधने

मी सेवक भक्त,तो सेव्य असा देव आणि उरलेली सारी सृष्टी म्हणजे पूजेची साधने. केवळ मूर्ती ,पाने,फुले,गंध,अक्षता म्हणजे पूजा नव्हे.जी जी तपस्येची  साधने,जी जी कर्माची साधने  ती सारी परमेश्वराच्या सेवेची.अशी ही विशाल दृष्टी आहे. 

जीवन सेवा परायण झाले पाहिजे. सेव्य असा तो परमेश्वर आणि त्याच्या सेवेसाठी सदैव उभा असा मी अक्षर पुरुष.अक्षर म्हणजे कधीही न भागणारा.असा हा आजन्म सेवक म्हणजे अक्षर पुरुष.परमात्मा  ही  संस्था जिवंत आहे व मी सेवक ही  सदैव आहे.प्रभू कायम तर मी ही  कायम. तो सेवा घेऊन दमतो की मी सेवा करून दमतो ,पाहूचया मौज. त्याने दहा अवतार घेतले तर माझे ही  दहा. तो राम  झाला तर मी हनुमान.तो कृष्ण झाला तर मी उद्धव. प्रत्येक क्रिया म्हणजे पुरुषोत्तमाची पूजा.          

सेव्य  परमात्मा पुरुषोत्तम ,सेवक जीव ( आत्मा ) हा अक्षर पुरुष. परंतु ही साधन रूप सृष्टी मात्र क्षरआहे. त्यामुळे सृष्टीत नित्य नवीनता आहे. कालची फुले आज चालत नाहीत.ती निर्माल्य झाली. सृष्टी नाशिवंत आहे हे मोठे भाग्य आहे.हे सेवेचे वैभव आहे.माझ्या साधनांना रोज नवीन स्वरूप देईन व देवाची पूजा करीन. नाशिवंतामुळे सौंदर्य आहे.सृष्टीचा नाशिवंतपणा म्हणजेच तिची अमरता. सृष्टीचे रूप झुळझुळ वाहून राहिले आहे.नदीचे पाणी अखंडपणे वाहत असते ,ते पाणी जिवंत राहते.ते वाहत नसेल तर त्याचे डबके होते. तसेच सेवा प्रांतात आहे. नवीन नवीन साधनांमुळे सेवेची हौस वाढते. सेवावृत्तीचा विकास होतो.     

अहंशून्य सेवा म्हणजेच भक्ती 

आपली प्रत्येक कृती भक्तिमय व्हावी ही गीतेची इच्छा आहे.गीतेसारख्या ग्रंथ राजाला घटका ,अर्धघटका पूजेने समाधान नाही. सारे जीवन हरिमय  व्हावे,पूजारूप व्हावे, हा गीतेला हव्यास आहे.    

ज्ञानलक्षण : मी पुरुष,तो पुरुष आणि हाही पुरूष  

कर्म म्हणजेच भक्ती ,ती निराळी कर्मात मिसळायची असे नाही. तीच गोष्ट ज्ञानाची. हे ज्ञान कशाने मिळेल?   गीता सांगते , “ सर्वत्र पुरुष दर्शनाने हे ज्ञान मिळेल “.  तू सेवा करणारा सनातन सेवक,सेवा पुरुष; तो पुरुषोत्तम सेव्य  पुरुष आणि नाना रूपधारिणी  ,नाना साधने पुरविणारी ही  सृष्टी; ही  सुद्धा पुरुषच. 

गीतेने शेवटी अद्वैतमय सेवेच्या मार्गावर आपणास आणले.सर्व सृष्टीत तीन पुरुष उभे आहेत. एकाच पुरुषोत्तमाने ही तिन्ही रूपे घेतलेली आहेत.तिन्ही मिळून एकाच पुरुष आहे. केवळ अद्वैतच आहे. गीतेने पारमोच्च शिखरावर येथे आपणास आणून सोडले. कर्म,भक्ती,ज्ञान एकरूपच झाली. जीव,शिव आणि सृष्टी एकाच झाली. कर्म ,भक्ती व ज्ञान यांत विरोधच राहिला नाही.जीवनातील सर्व कर्मात ज्ञान व भक्ती ओता. याला पुरुषोत्तम योग म्हणतात.    

सर्व वेद-सार माझ्याच हातात 

वेदांचे सार कोठे आहे? या अध्यायाच्या आरंभीच सांगितले आहे ,” छंदांसि यस्य पर्णानी “. ते वेद या वृक्षरूपी संसाराच्या पानां मध्ये भरलेले आहेत. सारांश, वेद  संस्कृतात नाहीत. संहितेत नाहीत. ते सृष्टीत आहेत. सेवा करा म्हणजे दिसतील.

सारांश ,वेदांचे सार हे आपल्या हातात आहे.सेवा,प्रेम व ज्ञान यावर जीवन रचावयाचे आहे. म्हणजेच हातात वेद आहे.मी अर्थ करीन तोच वेद आहे.वेद बाहेर नाहीत.

“ सर्व वेद मलाच जाणतात.मीच सर्व वेदांचा अर्क पुरुषोत्तम” असे भगवान सांगून राहिले आहेत. 

या अध्यायात सर्व गीतेचे सार आहे.गीतेची शिकवण येथे पूर्णपणे प्रकट झाली आहे. ती जीवनात उतरवण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस झटावे ,दुसरे काय?