अध्याय 14 – गुणत्रय विभाग योग ( गुणोत्कर्ष आणि गुणनिस्तार )
सारांश :
प्रकृतीची चिकित्सा :
आत्मा स्वयंपूर्ण आहे. आत्म्याला खरोखर काही करून घ्यावयाचे आहे असे नाही . आत्म्याची स्वाभाविक ऊर्ध्वगामी गती आहे.परंतु एखाद्या वस्तूला जड वजन लावले म्हणजे ती जशी खाली खेचली जाते, त्या प्रमाणे या देहाचे ओझे आत्म्याला खाली खेचते.
जो स्वतःवर राज्य करतो तो विश्वाचा सम्राट होतो. देहाची आत्म्यावरील सत्ता दूर करा. देहाची सुखदुःखे परकीय आहेत. त्यांचा व आत्म्याचा काडीचाही संबंध नाही.
देहाला आत्म्यापासून अलग करणे हे जसे एका बाजूने विवेकाचे काम आहे, तसे ते दुसऱ्या बाजूने निग्रहाने काम आहे. विवेक आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी हव्यात. वैराग्य म्हणजे एक प्रकारे निग्रह. या चौदाव्या अध्यायात निग्रहाची दिशा दाखवली आहे. होडी वल्हविण्याचें काम वल्ही करतात. परंतु दिशा ठरविण्याचे काम सुकाणू करते. वल्ही आणि सुकाणू दोन्ही गोष्टी हव्यात. त्याच प्रमाणे देहाच्या सुखदुःखापासून आत्म्याला दूर करण्याचे कामी विवेक व निग्रह या दोन्ही गोष्टींची गरज आहे.
सर्व चराचरी जी प्रकृती तिच्यात तीन गुणन ठासून भरलेले आहेत. ते म्हणजे सत्व , रज आणि तम गुण हे होत. सर्वत्र या तीन गुणांचा मसाला आहे. कोठे कमी, कोठे थोडा अधिक एवढाच फरक. या तिन्ही पासून जेव्हा आत्म्याला अलग करू तेव्हाच त्याला देहापासून अलग करता येईल.निग्रहाने एक एक गुण जिंकीत जायचे व मुख्य वस्तूकडे ( मोक्ष) पोहचायचे.
तमो गुण आणि त्यावर उपाय: शरीर-परिश्रम
या तमोगुणाचा मुख्य परिणाम आळस.त्यातून पुढे झोप व प्रमाद .आळस हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा शत्रू. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा बिघडवतो. हा शत्रू आपल्यात शिरण्यास टपलेला असतो.जरा दोन घास जास्त खा ,की लावलेच लोळवायला याने. जरा थोडे जास्त झोपा , की डोळ्यावरून आळस जणू निथळताना दिसतो.आळसाला संधी ना देणे या साठी दक्ष राहिले पाहिजे. आळस सोडवायचा म्हणजे शरीर – परिश्रम करावयाचा. आपल्याला मिळालेले शरीर हे परिश्रम करण्यासाठीच आहे.शरीर श्रमात गेलेला वेळ फुकट जात नाही. त्याचा मोबदला मिळतोच.शिवाय मोकळ्या हवेत राहाल तर विचारही तेजस्वी होतील.
तमोगुणावर आणखी उपाय
दुसरी गोष्टी म्हणजे झोप जिंकणे. झोप ही वस्तुतः पवित्र गोष्ट आहे. सेवा करून थकलेल्या साधू संतांची झोप म्हणजे तो योगच आहे. अशा प्रकारची शांत व गाढ झोप केवळ भाग्यवंतानाच लाभते. झोप खोल असावी. अर्धा तास मन लावून केलेला अभ्यास चंचल वृत्तीने केलेल्या तीन तास अभ्यासापेक्षा अधिक फळ देतो. झोपेचे ही तसेच आहे. देह सारखा वापरीत राहिले पाहिजे.म्हणजे अंथरुणावर पडल्या बरोबर झोप लागेल.
तमो गुणाची तिसरी गोष्ट म्हणजे “ प्रमाद” होय. झोपेने आळस येतो.आळसाने विसर पडतो. विस्मरण हा मोठा रोग आहे.प्रमदाला जिंकण्यासाठी प्रथम आळस व निद्रा याना जिंकून घ्या.कृतीच्या आधी विचार केला पाहिजे. तसेच कृतीच्या नंतर विचार केला पाहिजे. म्हणजे हातून प्रमाद घडणार नाही. क्षणाक्षणाचा हिशेब राखा म्हणजे आळस दूर जाईल.अशा रीतीने आळस व सर्वच तमोगुण जिंकता येईल.
रजो गुण आणि त्यावर उपाय:स्वधर्म मर्यादा
नंतर रजोगुणाकडे वळू.रजोगुणाही एक भयानक शत्रू आहे. रजोगुणाला तमोगुणाची दुसरी बाजू ही म्हणता येईल.एकाबरोबर दुसराही येतो. हे रजोगुण व तामो गुण एकमेकांना सहाय्यक होऊन माणसाचा नाश करतात. जसा फ़ुटबाँल दोन्ही बाजूनी लाथा खातो, तसाच रजोगुणाच्या व तमोगुणाच्या लाथा खाण्यात माणसाचा जन्म जातो.
रजोगुणाचे प्रमुख लक्षण म्हणजे नाना प्रकारची कार्ये करण्याचा हव्यास.अचाट कर्मांची अपार आसक्ती. रजोगुणामुळे अपरंपार कर्मसंग जडतो. डोंगरात बोगदा करून रस्ता सरळ करा.समुद्रात माती घालून समुद्र बुजवा. सहारा वाळवंटात पाणी सोडून तिकडे समुद्र करा.अशी कार्ये करण्याची इच्छा होते.पक्षी उडतो ते पाहून मनुष्य विमाने बनवतो. मासे पाण्यात राहतात म्हणून आम्ही पाणबुडी बनवितो.एखादा पहिलवान त्याच्या अंगात खुमखुमी आली की ती जिरवण्यासाठी तो भिंतीला तडाखे देतो किंवा झाडाला धक्के देतो , तशी रजोगुणाची उसळी असते.या उसळीसरशी तो पृथ्वीला खणून काही दगड वर काढतो आणि त्यांना हिरे-माणके अशी नावे देतो.समुद्रातून काही कचरा वर काढतो व त्याना मोती असे नाव देतो.या मोत्याना मग भोके पाडतात व ती मोत्ये अंगावर मिरवण्यासाठी आपल्याच नाकाना आणि कानांना सोनाराकडून भोके पाडतात. हा सारा रजोगुणाचा प्रभाव आहे.
रजोगुणाचा दुसरा परिणाम म्हणजे माणसात स्थिरता राहत नाही. रजोगुणाला तात्काळ फळ हवे असते.मग जरा अडथळा आला म्हणजे मनुष्य घेतलेला मार्ग सोडतो. रजोगुणी मनुष्य हे धर,ते सोड अशी धरसोड करतो.परिणामतः शेवटी हातात काही पडत नाही.सारे यश मिळविण्यास तो अधीर होतो. आज मद्रासला मानपत्र ,उद्या कलकत्त्याला तर परवा मुंबई – नागपूरला, अशी धावपळ सुरु होते.अशी रजोगुणी माणसाची फार भयानक स्थिती होते.
रजोगुणामुळे मनुष्य नाना धंद्यात लुडबुड करतो. त्याला स्व-धर्म राहत नाही. स्वधर्माचरण म्हणजे इतर नाना कर्मांचा त्याग करणे. गीतेतील कर्मयोग हा रजोगुणावर तोडगा आहे.मनुष्य जर आपली सारी शक्ती नाना प्रकारच्या उद्योगात न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील ,तरच त्याच्या हातून काही कार्य घडेल. म्हणून स्वधर्मास महत्त्व आहे.
स्व-धर्म कसा ठरवावा
स्वधर्म स्वाभाविक असतो.तो शोधावा लागत नाही. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्म जन्माला येतो. मुलाला जशी आपली आई शोधावी लागत नाही तसेच स्वधर्मही शोधावा लागत नाही.तो आगाऊच मिळालेला असतो. मला जर भूक लागते ,तहान लागते तर भुकेल्याला जेऊ घालणे आणि तहानेल्याला पाणी पाजणे हा धर्म मला ओघानेच लाभला.आपण सारे एका प्रवाहात काही एका परिस्थितीसह जन्मलो असल्यामुळे स्वधर्माचरण रूप कर्तव्य आपोआपच प्राप्त झालेले असते.
स्वधर्मात मग्न झाले म्हणजे रजोगुण फिका पडतो. कारण चित्त एकाग्र होते. चंचलपणाचा सारा जोरच निघून जातो.सगळी धावपळ संपते. अशा रीतीने रजोगुण जिंकायचा.
सत्त्व गुण आणि त्यावर उपाय
आता उरला सत्त्व गुण .याच्याशी जपून वागले पाहिजे. तमोगुण व रजोगुण यांच्या प्रमाणे याचा निकाल लावावयाचा नाही.पण त्याच्यापासून येणार अभिमान मात्र दूर सारावयाचा.सत्त्व गुण जिंकणे म्हणजे त्याबद्दलचा अभिमान ,त्याबद्दलची आसक्ती दूर करणे.सत्त्व गुणापासून काम तर करून घ्यायचे पण, ते युक्तीने. सत्त्व गुणाला निरहंकारी बनावावयाचे.सत्त्वगुण स्वाभाविक करून घ्यायचा ,म्हणजे त्याची प्रौढी करावीशी वाटणार नाही.
सूर्य प्रकाश देतो.त्याच्या मुळे जग राहटी चालते. पण त्याला विचारले ,” एवढे मोठे काम कसे काय करतोस?” तर तो म्हणेल,” मी विशेष काही करत नाही. प्रकाश देणे हा माझा स्वधर्म आहे!
प्रथम अहंकार जिंकावा. मग आसक्ती जिंकावी. फलासक्ति सोडून सत्त्व गुणामुळे मिळणारे फळही ईश्वरार्पण करून आसक्ती जिंकायची.म्हणजे सत्त्व गुणही जिंकला असे होईल.
शेवटची गोष्ट: आत्मज्ञान आणि भक्तीचा आश्रय
तुम्ही जरी तमोगुण आणि रजो गुण जिंकलेत तरी ते परत परत येताच राहतील.तेव्हा सतत जागृत राहा, याना जवळ येऊ देऊ नका.आत्मज्ञान आणि आत्म दर्शन प्राप्त करून घ्या. हे कसे होईल? केवळ जागृत राहून किंवा अभ्यासानेही आत्मज्ञान होणार नाही. एकच उपाय आहे. तो म्हणजे,” भगवंतांची अत्यंत जिव्हाळ्याने कळकळीने भक्ती करणे .” या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने हाच प्रश्न विचारला.भगवंतांनी उत्तर दिले,” अत्यंत एकाग्र मनाने,निष्काम पणे माझी भक्ती कर. माझी सेवा कर.म्हणजे तू हा माया सागर तरुन मला प्राप्त होशील.” तेव्हा भक्ती हा एकाच मार्ग आहे.