अध्याय 16 -परिशिष्ट १. दैवी आणि आसुरी वृत्तीचा झगडा
सारांश :
पुरुषोत्तम-योगाची पूर्व प्रभा : दैवी संपत्ती
गीतेच्या पहिल्या पाच अध्यायांत जीवनाची एकूण योजना काय आहे आणि आपला जन्म कसा सफल होईल ते आपण पाहिले. त्यानंतर सहाव्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत भक्तीचा निरनिराळ्या प्रकारे विचार केला.बाराव्या अध्यायात सगुण व निर्गुण भक्ती यांची तुलना करून भक्तांची थोर लक्षणे पाहिली. बाराव्या अध्यायाच्या अखेर पर्यंत कर्म व भक्ती ही दोन तत्वे तपासून झाली. तिसरा ज्ञानाचा विभाग राहिला होता तो आपण तेरा,चौदा आणि पंधरा या अध्यायात पहिला. आत्मा देहापासून अलग करणे,त्यासाठी तिन्ही गुण जिंकून घेणे व शेवटी सर्वत्र प्रभू पाहणे.पंधराव्या अध्यायात जीवनाचे संपूर्ण शास्त्र पाहिले.पुरुषोत्तम योगात जीवनाची पूर्णता होते.
आता या सोळाव्या अध्यायात काय सांगितले आहे?ज्या प्रमाणे सूर्योदय व्हायचा असला म्हणजे आधी प्रभा फाकते ,त्या प्रमाणे जीवनात कर्म,भक्ती व ज्ञान यांनी पूर्ण असा पुरुषोत्तम- योग उदय पावण्या पूर्वी सद्गुणांची प्रभा बाहेर फाकू लागते. परिपूर्ण जीवनाची ही आगामी प्रभा,त्या प्रभेचे वर्णन या या सोळाव्या अध्यायात केले आहे.परी पूर्ण जीवनाच्या चांगल्या गुणांना गीता दैवी संपत्ती हे नाव देते. त्याच्या विरुद्ध जे गन त्यांना असुरी म्हटले आहे. सोळाव्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्ती यांचा झगडा दाखविला आहे.
सद्गुणांची आणि दुर्गुणांची सेना
गीतेमध्ये ,कर्तव्यासंबंधी मोह पडला असता कसे वागावे ,ही गोष्ट युद्धाचे रूपक देऊन मांडली आहे.तसेच या सोळाव्या अध्यायात चांगल्याचा आणि वाईटाचा झगडा दाखविला आहे.
आपल्या अंतःकरणात एका बाजूस सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण उभे आहेत.दोघांनीही सैन्याप्रमाणे आपापली रचना नीट केली आहे. युद्धात सेनापती असतोच.तसेच,निर्भयता सर्व गुणांचा नायक आहे. पण सैन्याला आघाडी व पिछाडी दोन्ही कडे पाहावे लागते. सद्गुणांच्या आघाडीस “ निर्भयता” ठाण मांडून उभी आहे तर पिछाडी “नम्रता” सांभाळीत आहे.या दोन गुणांच्या मध्ये जे २४ गुण आहेत ते बहुतेक अहिंसेचेच पर्याय आहेत असे म्हटले तरी चालेल.भूतदया ,मार्दव,क्षमा,शांती,अक्रोध ,अद्रोह हे निरनिराळे अहिंसेचेच पर्यायी शब्द आहेत.अहिंसा व सत्य या दोन गुणात सारे येऊन जातात.तात्पर्य, सत्य व अहिंसा यांचा विकास निर्भयता आणि नम्रता यांनी होतो.
एका बाजूने सद्गुणांची फौज उभी आहे ,तशी तिकडे दुर्गुणांची ही उभी आहे. दंभ व अज्ञान या दुर्गुणांबद्दल फार बोलावयास नको. आपले सर्व आयुष्यच दंभावर उभारल्यासारखे झाले आहे. अज्ञान ही एक गोजिरवाणी सबब आपण पदोपदी मांडत असतो.ते फार चूक आहे. कायद्याचे अज्ञान ही काही बचावाची गोष्ट होऊ शकत नाही असे कायद्यात सांगतात. तसेच ईश्वराच्या कायद्याचे अज्ञान ही फार मोठा गुन्हा आहे. दुसऱ्याच्या पापाबद्दल क्षमा करावी पण स्वतःच्या अज्ञानाला क्षमा करणे पाप आहे. स्वतःचे अज्ञान शिल्लक ठेवता नये.
अहिंसा
आपण माणसा माणसा मधील युद्धे पाहत आलो आहोत. वरकरणी ,सर्वत्र शांतता व्हावी म्हणून आम्ही युद्ध करतो असे म्हटले जाते. परंतु,एक गोष्ट नक्की की स्वतः हिंसामय होऊन हिंसेला दूर करणे शक्य नाही.उलट त्यामुळे हिंसकांची संख्या मात्र वाढते.
अहिंसेचा एक महान प्रयोग : मांसाहार परित्याग
माणसा माणसा मधील अहिंसा ही एक बाजू झाली.परंतु माणसांचा व पशूंचा ही झगडा आहे.माणसांनी अजून आप आपसातील झगडे मिटवले नाहीत परंतु पोटात पशु कोंबून तो जगत आहे.हजारो वर्षे जगून कसे जगावे याचा विचार माणसाने अद्याप केला नाही.परंतु याही गोष्टीचा विकास होत आहे. आदिमानव बहुदा कंद-मूळ फलाहारीच असेल ,पण पुढे दुर्मति वशात पुष्कळसा मानव-समाज मांसाहारी बनला.
पूर्वी यज्ञात पशु हत्या होत आणि ऋषी मुनीही मांसाहार करत असत.परंतु निग्रहाने त्यांनी पुढे तो सोडला.आज बरेच लोक शाकाहारी आहेत. काही लोक तर प्राणिजन्य पदार्थ ( दूधही ) सोडून राहिले आहेत.
आसुरी संपत्तीची तिहेरी महत्त्वाकांक्षा : सत्ता ,संस्कृती आणि संपत्ती
दैवी संपत्तीचा विकास करावयाचा आणि आसुरी संपत्ती पासून दूर राहायचे, या साठी भगवंतांनी आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. असुरांच्या चरित्रांचे सार ‘सत्ता ,संस्कृती आणि संपत्ती’ या तीन गोष्टीत आहे. आपली संस्कृती काय ती उत्कृष्ट व तीच साऱ्या जगावर लादली जावी ,ही महत्त्वाकांक्षा. आपलीच संस्कृती का लादली जावी?तर ती म्हणे चांगली आहे. ती चांगली का? तर ती आपली आहे म्हणून. आसुरी व्यक्ती काय किंवा अशा व्यक्तींनी बनलेली साम्राज्ये काय ,त्यांना या तीन गोष्टी पाहिजे असतात.
तुझी संस्कृती उत्तम असेल तर तुझ्या कृतीतून ती दिसूदे.जी संस्कृती स्वतःच्या जीवनात नाही ,स्वतःच्या घरात नाही ,ती जगभर फैलाऊ पाहणे या विचारसरणीला आसुरी म्हणतात.
ज्या प्रमाणे माझी संस्कृती सुंदर ,त्या प्रमाणे जगातील सारी संपत्ती घ्यावयास लायक मीच. सारी संपत्ती मला पाहिजे व मी ती मिळवणारच. ती संपत्ती का मिळवायची ? तर बरोबर वाटणी करण्यासाठी ! यासाठी स्वतःस संपत्तीत पुरून घ्यायचे ! हल्लीच्या असुरांस असेच वाटते की सारी संपत्ती एकत्र करायची.
संपत्ती एकत्र करण्यासाठी मला सत्ता हवी. सारी सत्ता एका हाती केंद्रीभूत झाली पाहिजे. ही तमाम दुनिया माझ्या तंत्राखाली राहिली पाहिजे. माझ्या ताब्यात जे असेल,माझ्या तंत्रा प्रमाणे जे चालेल,तेच खरे स्वातंत्र्य. अशा प्रकारे सत्ता, संस्कृती आणि संपत्ती या तीन गोष्टीवर, आसुरी संपत्तीत भर दिला जातो.
काम-क्रोध-लोभ मुक्तीचा शास्त्रीय संयम मार्ग
आसुरी संपत्ती दूर सारण्याचा प्रयत्न करावा.आसुरी संपत्ती म्हणजे थोडक्यात “काम-क्रोध-लोभ” . हे सोडलेच पाहिजेत.क्रोध व लोभ हे कामातून उत्पन्न होतात. कामाला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे लोभ उत्पन्न होतो व प्रतिकूल परिस्थिती असली म्हणजे क्रोध उत्पन्न होतो.काम-क्रोध-लोभ हे नरकाचे तीन भव्य दरवाजे आहेत. या दरवाज्यातून पुष्कळ रहदारी आहे. अनेक लोक जातात येतात. नरकाचा रस्ता ऐसपैस रुंद आहे. तेथून मोटारी जातात. वाटेत सोबतीही भेटतात. परंतु सत्याचा रस्ता अरुंद आहे.
हे सारे लक्षात घेऊन सृष्टीत बेताने रहा. बेताल वागू नका. लोक-संग्रह करणे याचा अर्थ लोक म्हणतील तसे वागणे हा नव्हे. माणसांचे संघ वाढविणे,संपत्तीचे ढीग जमा करणे म्हणजे सुधारणा नव्हे. लोक संग्रह म्हणजे सुंदर व नीतीचा मार्ग लोकांस दाखविणे.
सारांश,भगवंतांनी आसुरी संपत्ती दूर करून दैवी संपत्ती जवळ करावी असे या अध्यायात कळकळीने सांगितले आहे. त्या प्रमाणे यत्न करावा.