09 Oct 2022

अध्याय ६ – आत्मसंयमयोग ( चित्तवृत्ती निरोध)

कर्मयोग आणि संन्यासयोग दोन्ही एकरूपच होतात हे आपण मागच्या अध्यायात पाहिले. पाचव्या अध्यायात वर्णन केलेल्या अवस्थेची साधने पहावयाची हा ह्या पुढील अध्यायांचा विषय आहे. 

परमार्थ ,गीता वगैरे ग्रंथ साधूंसाठीच  आहेत अशी एक भ्रामक कल्पना अनेक लोकांची झालेली आहे. गीतारहस्यात लोकमान्य टिळकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. टिळकांची भूमिका अक्षरशः खरी आहे. विनोबांनी सुद्धा हीच भूमिका घेतली आहे.  गीता  ही  व्यावहारिक माणसांसाठीच आहे. आपला व्यवहार शुद्ध आणि निर्मळ होउन मनाचे समाधान व शांती कशी लाभावी हे गीता आपल्याला सांगते. 

या अध्यायात ध्यानयोग हा साधनेचा प्रकार सांगितला आहे.

चित्ताची एकाग्रता :

ध्यानयोगात तीन प्रमुख गोष्टी आहेत .

(१) चित्ताची एकाग्रता :व्यवहार असो की परमार्थ असो ,त्यात चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय यश मिळविणे कठीण आहे. ही  एकाग्रता कशी मिळेल ? ज्याप्रमाणे स्वतः कष्ट करून सधन झालेला मनुष्य अनाठायी खर्च करीत नाही ,त्याच प्रमाणे आपण आपल्या आत्म्याची ज्ञान शक्ती क्षूद्र वस्तूंच्या चिंतनात खर्चू नये. 

(२) चित्ताच्या एकाग्रतेस उपयुक्त अशी जीवनाची परिमितता: सर्वत्र मोजमाप ठेवा .प्रत्येक इंद्रियावर पहारा ठेवा. मी जास्त खात नाही ना ,फार झोपत नाही ना ,डोळ्याने अयोग्य गोष्टी पाहात नाही ना  असे सारखे बारकाईने तपासले पाहिजे . 

(३) साम्य दशा किंवा समदृष्टी: सम  दृष्टी म्हणजे  शुभ दृष्टी .सर्व काही चांगले आहे. कोणतीही भीती मनात नको. सारी दुनिया भक्षक आहे असाच विचार करत राहिले तर कुठली शांती?

या तीन गोष्टीं बरोबर आणखी दोन साधने सांगितली आहेत, ती म्हणजे वैराग्य आणी अभ्यास. मनात सद्विचारांचे पुनः पुन्हा चिंतन करावयाचे हा अभ्यास.