अध्याय 18 -उपसंहार -फलत्यागाची पूर्णता
सारांश :
अर्जुनाचा शेवटचा प्रश्न
चौदाव्या अध्यायात, सात्त्विक राजस व तामस, असे जीवनाचे किंवा कर्माचे तीन प्रकार केले.त्यातील राजस व तामस टाकून सात्त्विकाचा स्वीकार करावयाचा हे आपण पाहिले.त्या नंतर सतराव्या अध्यायात तोच प्रकार निराळ्या रीतीने पाहिला. यज्ञ,दान ,तप किंवा एकाच शब्दात सांगावयाचे झाले तर यज्ञ हे जीवनाचे सार आहे.
म्हणून शेवटी अठराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न केला ,” कोणतेही कर्म फलत्यागपूर्वक करावे ही एक बाजू . पुन्हा काही कर्मे अवश्यमेव टाकावी व काही करावी ही दुसरी बाजू ,यांचा मेळ कसा घालावा ?” जीवनाची दिशा स्पष्ट कळावी म्हणून हा प्रश्न आहे.
फलत्यागात कर्माचा फलतः त्याग करायचा असतो. गीतेच्या फलत्यागाला ,प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता आहे का? हा प्रश्न आहे.फलत्यागाच्या कसोटीत संन्यासाचा उपयोग आहे का ? संन्यासाची मर्यादा कोठपर्यंत ? सन्यास व फल त्याग या दोहोंच्या मर्यादा कशा व किती ? असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे.
फलत्याग सार्वभौम कसोटी
उत्तर देताना भगवंतांनी एक गोष्ट साफ सांगून टाकली की ,फलत्यागाची कसोटी ही सार्वभौम वस्तू आहे.फलत्यागाचे तत्त्व सर्वत्र लावता येते.
फलत्यागपूर्वक कर्म करावे याचा अर्थच हा होतो की,काही कर्मे सोडलीच पाहिजेत. फलत्यागपूर्वक कर्म करण्यात प्रत्यक्ष काही कर्माचा त्याग येऊनच जातो.
या गोष्टीचा जरा खोल दृष्टी ठेऊन विचार करूया. ज्याच्या मुळाशी कामना आहे ( काम्य ) ती कर्मे फलत्यागपूर्वक करा असे म्हणताच ढासळून जातात.फलत्यागासमोर काम्य व निषिद्ध कर्मे ढासळून जातात. फलत्यागपूर्वक कर्म करा असे सांगण्यातच ,कोणते करावे आणि कोणते करू नये हे समजून येते. हिंसात्मक कर्मे,असत्य कर्मे,चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येणारच नाहीत. आता राहिली शुद्ध सात्त्विक कर्मे. ती अनासक्त रीतीने अहंकार सोडून करायची.आणखी एक तिसरी गोष्ट अशी की जो त्याग होईल ,त्या त्यागावरही फलत्यागाची कतार लावावयाची.एवढा त्याग मी केला असा अहंकार होऊ द्यायचा नाही.
आता आपण एका सात्त्विक कर्माचा विचार करू. शेतीचा स्वधर्म घेतला तर ती शुद्ध सात्त्विक क्रिया आहे. परंतु या यज्ञमय स्वधर्मरूप शेतीतही हिंसा येते. नांगरताना वगैरे कित्येक जीवजंतू मरतात. विहिरीजवळ चिखल होऊ नये म्हणून दगड बसविताना कित्येक जीव जंतू मरतात. सारांश,सात्विक स्वधर्म रूप कर्मातही दोष येतो, तर कसे करायचे?
क्रियेतून सुटण्याची खरी रीत
मांजर हिंसा करते म्हणून तिचा त्याग केला तर उंदीर हिंसा करतील. साप हिंसा करतो म्हणून त्याला दूर केला तर शेतीची शेकडो जंतू हिंसा करतील .शेतातील पिकांचा नाश झाल्याने हजारो माणसे मरतील. यासाठी विवेकयुक्त त्याग केला पाहिजे.
क्रिया निराळी व कर्म निराळे हे समजून घ्या. ज्ञानी मनुष्य लेशमात्रही क्रिया करत नाही. परंतु तो कर्म अनंत करतो.त्याचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. तो ज्ञानी मनुष्य नुसता असो म्हणजे झाले. त्याचे हात पाय कार्य करत नसतील तरी ही तो काम करतो.क्रिया सूक्ष्म होत जाते व कर्म उलट वाढत जाते.वरून वरून कर्म दूर केल्याने ते दूर होणार नाही. निष्कामता पूर्वक कर्म करता करता हळूहळू त्याचा अनुभव येईल.
साधकासाठी स्वधर्माचा उलगडा
सारांश,राजस व तामस कर्मे अजिबात सोडवायची.सात्त्विक कर्मे करायची आणि हा विवेक करायचा कि जी सात्त्विक कर्मे सहज ओघाने प्राप्त झाली ती सदोष असली तरी ती टाकायची नाहीत. सात्त्विक कर्मे सदोष असली तरी ती ओघप्राप्त आहेत म्हणून ती सोडायची नाहीत. ती करायची ;परंतु त्यांचा फलत्याग करायचा.
साधनेची पराकाष्ठा तीच सिद्धी
आता दुसराच एक विषय विचारासाठी घेऊ.साधकाने संपूर्ण क्रिया गळून पडणे ही जी शेवटची स्थिती ,तिच्याकडे लक्ष ठेवायचे का? क्रिया न करता ज्ञान्याच्या हातून कर्म होत राहील ही जी ज्ञानी पुरुषाची स्थिती तिच्याकडे साधकाने दृष्टी ठेवायची का?
नाही. येथेही फलत्यागाची कसोटीच हाती घ्यायची. आपल्या जीवनाचे स्वरूप इतके सुंदर आहे कि जे आपणास पाहिजे असते ते लक्ष न ठेवताही आपणास मिळेल. जीवनाचे सर्वात मोठे फलित म्हणजे मोक्ष. तो मोक्ष,ती अकर्मवस्था ,तेथेही लोभ नको. ती स्थिती नकळत अंगी येईल. मोक्षाची आशा सोडाल तेव्हाच मोक्षाकडे न कळत जाल.साधनाच इतक्या तन्मयतेने होउदे कि मोक्षाचा विसर पडावा व मोक्ष तुला शोधत तुझ्या समोर येऊन उभा राहावा. साधकाने साधनेतच रंगून जावे.’ मा ते संगोस्त्व कर्मणि ‘ – अकर्मदशेची,मोक्षाची आसक्ती धरू नको ,असे भगवंतांनी मागेच सांगितले होते. आता पुन्हा शेवटी सांगत आहेत – ‘अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ‘. मोक्ष दाता मी समर्थ आहे.तू मोक्षाची फिकीर करू नको. तू साधनेची फिकीर कर. अकर्म स्थिती,विश्रांती या गोष्टींचा हव्यास नको. साधनेवरच प्रेम करा ,की मोक्ष अचूक साधेल.
पाण्यात गटांगळ्या खात असता पैल तीरावरील मौज डोळ्यासमोर ठेऊन कसे चालेल?त्या वेळेस एक एक हात मारून पुढे जाण्यातच सारे लक्ष ,सारी शक्ती असली पाहिजे.साधना पुरी कर. समुद्र ओलांड ; मोक्ष आपोआपच मिळेल.
सिद्ध पुरुषाची तिहेरी भूमिका
साधकाच्या साधनेची पराकाष्ठा म्हणजे साधकाच्या साधनेची सहजावस्था किंवा भावावस्था. ज्ञानी पुरुष निरहंकार होतो. त्याचा देहाभिमान गळतो.ती अवस्था एका देहात मावत नाही. भावावस्था म्हणजे क्रियावस्था नव्हे.भावावस्था म्हणजे भावनेच्या उत्कटतेची अवस्था.
भावावस्थे प्रमाणे ज्ञानी पुरुषाची एक क्रियावस्था ही आहे. ज्ञानी पुरुष जे जे करील ते ते सात्त्विकच असणार.व्यवहाराच्या बाजूने पाहाल तर सात्विकतेची पराकोटी त्याच्या वर्तनात दिसेल. विश्वात्म भावाच्या दृष्टीने पाहाल तर सर्व त्रिभुवनात पाप पुण्ये जणू तो करतो.इतके असूनही तो अलिप्त असतो.कारण हा चिकटलेला देह त्याने उधडून फेकून दिलेला असतो. क्षुद्र देहाला फेकील तेव्हाच तो विश्वरूप होईल.
भावावस्था व क्रियावस्था याशिवाय ज्ञानी पुरुषाची तिसरी एक स्थिती आहे. ती म्हणजे ज्ञानावस्था. या अवस्थेत तो पापही सहन करत नाही ,पुण्यही सहन करत नाही.तो झडझडून सारे फेकून देतो. या त्रिभुवनास काडी लावून देण्यास तो तयार असतो.
अशा या तीन अवस्था ज्ञानी पुरुषाच्या मोक्ष दशेत ,साधनेच्या पराकाष्ठेच्या दशेत संभवतात.
“ तूच … तूच… तूच”
एवढे सारे सांगून भगवान अर्जुनाला म्हणाले ,” अर्जुना ,मी तुला हे सांगितले ,ते सारे नीटपणे ऐकलेस ना? आता पूर्ण विचार करून तुला सुचेल तसे कर.” भगवंतांनी अर्जुनाला मोठेपणाने स्वातंत्र्य दिले. भगवद्गीतेचा हा विशेष आहे. परंतु भगवंतांना पुन्हा कळवळा आला. दिलेले स्वातंत्र्य त्यांनी पुन्हा काढून घेतले.” अर्जुना ,तुझ्या इच्छा ,तुझी साधना ,सारे फेकून दे ,व मला शरण ये.” याचाच अर्थ असा की ,आपल्याला स्वतंत्र अशी इच्छाच नको.स्वतःची इच्छा चालवायची नाही,सर्व काही ‘त्याच्या’ इच्छेवर सोडून द्यायचे.