21 Oct 2022

अध्याय 12 – सगुण – निर्गुण भक्ती

सारांश :

भक्तिरसाचे माहात्म्य 

हा लहानसा  वीस श्लोकांचा अध्याय, परंतु अमृताची धार आहे.या अध्यायात भगवंतांच्या मुखातून भक्तिरसाच्या महात्म्याचे तत्त्व  गाइले गेले आहे.  

सगुण उपासक आणि  निर्गुण उपासक

अर्जुन प्रश्न विचारतो की , काही जण सगुणाची उपासना करतात तर काही निर्गुणाची उपासना करतात. तेव्हा ह्या दोहोंतून कोणता भक्त देवा तुला प्रिया आहे?

दोघे ही भक्त एकरूप आहेत. दोघांची योग्यता सारखीच. 

पाचव्या अध्यायात अर्जुनाने असाच प्रश्न विचारला होता की कर्मयोग श्रेष्ठ की  सन्यासयोग ? भगवंतांनी सांगितले की दोन्ही एकाच ठिकाणी मोक्षाप्रत पोहचतात.परंतु कर्म योग सामान्य लोकांना सुलभ आहे ,म्हणून तो सन्यास योगापेक्षा थोडा श्रेष्ठ आहे.  

सगुण  निर्गुणाचा प्रश्न ही तसाच आहे. एक सगुण भक्त इंद्रियांच्या द्वारे परमेश्वराची सेवा करतो. दुसरा निर्गुण भक्त मनाने विश्वाचे हित चिंतितो. पहिला बाहेरून  सेवा मग्न दिसतो आणि आतून त्याचे सारखे चिंतन चालले आहे. दुसरा जो आहे तो प्रत्यक्ष सेवा करताना दिसत नाही पण आतून महासेवा चाललीच आहे. हे दोघे आतून एकच आहेत. परमेश्वराचे लाडके आहेत. पण सगुण भक्ती जास्त सुलभ आहे. 

सगुण सुलभ आणि सुरक्षित आहे-

सगुण उपासकाला इंद्रिये ही साधन रूप आहेत. इंद्रिये ही फुले आहेत. ती देवाला वाहावयाची आहेत.डोळ्यांनी हरिरूप पाहावे,कानांनी हरिकथा ऐकावी,जिभेने नाम उच्चारावे ,पायांनी तीर्थयात्रा कराव्या  आणि हातानी सेवा करावी. अशा प्रकारे सर्व इंद्रिये परमेश्वराला वाहतो. ती भोगासाठी राहत नाहीत. फुले देवाला वाहायची. फुलांच्या माळा स्वतःच्या गळ्यात घालावयाच्या नसतात. 

निर्गुण उपासकाला इंद्रिये विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो ,कोंडतो. इंद्रियांचा आहार तोडतो.इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रिये हरी चरणी अर्पण करतो. दोनीही तऱ्हा इंद्रिय निग्रहाच्याच आहेत. इंद्रिय दमानाचेच हे दोनीही प्रकार आहेत.काही ही माना, पण इंद्रिये ताब्यात ठेवा. सगुण उपासनेचा मार्ग सोपा आहे,निर्गुण उपासना कठीण आहे. 

निर्गुण उपासक हा सर्वभूतहितरत आहे. ही गोष्ट सामान्य नाही.ज्याला समग्र विश्वाच्या कल्याणाची चिंता आहे ,त्याला ह्या चिंतना  शिवाय दुसरे काहीही करता येणार नाही. म्हणून निर्गुण उपासना कठीण आहे. सगुण उपासना नाना प्रकारे आपल्या शक्ती प्रमाणे करता येईल.जेथे आपण राहतो त्या खेड्याची सेवा करणे ,आई बापांची सेवा करणे ही सगुण पूजा आहे. ती तुमची सेवा जगाच्या हिताशी विरोधी नसली म्हणजे झाले. 

सुलभतेचा  एक मुद्दा   झाला.तसाच दुसरा ही मुद्दा आहे. निर्गुणात  भय आहे.निर्गुण हे ज्ञानमय आहे. सगुण  हे प्रेममय ,भावनामय आहे.सगुणा मध्ये ओलावा आहे.येथे भक्त जास्त सुरक्षित आहे. निर्गुणात धोका आहे. 

सगुणाला निर्गुणाची मदत पाहिजे. केव्हा तरी व्यक्तीतून ,साकारातून बाहेर पडले पाहिजे.उदा. कमान बांधीत असताना तिला आधार देतात. परंतु नंतर आधार काढून घेतात. आधार काढून घेतल्यावर ती कमान  टिकली तरच तो आधार खरा होता असे समजायचे. प्रथम स्फूर्तीचा झरा सगुणातून निर्माण झाला हे खरे, परंतु शेवटी  परिपूर्णता तत्त्वनिष्ठेत, ,निर्गुणात झाली पाहिजे. भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुले लागली पाहिजेत.

हिंदू ,ख्रिश्चन ,इस्लाम इत्यादी सर्व धर्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारची मूर्ती पूजा आहे. मूर्तिपूजा जरी खालच्या पायरीची मनाली गेली तरी ती मान्य आहे. थोर आहे. जो पर्यंत मूर्तीपूजेला निर्गुणाची मर्यादा असते तो पर्यंत ती निर्दोष राहते. परंतु ही  मर्यादा सुटताच सगुण सदोष होते. सर्व धर्मातील सगुण ,निर्गुणाच्या मर्यादेच्या अभावी,अवनत दशेला पोहचले आहे. पूर्वी यज्ञ यागात पशुहत्या होत. आजही शक्ती देवीला बळी देतात.मूर्तिपूजेचा हा अत्याचार झाला. मर्यादा सोडून मूर्तिपूजा भलतीकडेच गेली.निर्गुण निष्ठेची मर्यादा असल्यास ही धास्ती राहत नाही . 

सारांश,सगुण व निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण  सुलभ आहे. निर्गुण थोडे कठीण आहे.शेवटी, भगवान सांगतात ,” अर्जुना , तू सगुण ऐस की निर्गुण ऐस ,भक्त ऐस म्हणजे झाले,गोटा राहू नकोस.” असे सांगून भगवंतांनी भक्ताची लक्षणे दिली आहेत. ही  लक्षणे मधुर आहेत.त्यांचा अनुभव घ्यावा.ही  लक्षणे रोज सेवन करावी,मनन करावी. त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात  आणून पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा रीतीने जीवन हळु हळू परमेश्वराकडे न्यावे.