19 Oct 2022

अध्याय 11 – विश्वरूपदर्शन योग

सारांश :

विश्वरूप-दर्शनाची अर्जुनाची हौस –

मागच्या अध्यायात विश्वातील अनंत वस्तूत भरून राहिलेला परमात्मा कसा ओळखावा याचा अभ्यास आपण केला. आधी ठळक आणि मग बारीक वास्तूत आत्मा पाहता येईल. माणसात,प्राण्यांत,सूक्ष्म जिवात ,वनस्पतीत आणि लहान मोठ्या निर्जीव वास्तूतही तो कसा पाहावा हे पहिले. 

आजच्या अकराव्या अध्यायात, भगवंतांनी प्रत्यक्ष आपले विराट रूप दाखवून अर्जुनावर परम कृपा प्रगट केली आहे.अर्जुन म्हणाला,”देवा,तुझे ते संपूर्ण रूप मला पाहावेसे वाटते. ज्या रूपात तुझा सर्व महान प्रभाव प्रगट झाला आहे, असे रूप मला डोळ्यांनी पाहावयास मिळो”.

आपण ज्याला जग म्हणतो ते म्हणजे या विश्वाचा लहान भाग आहे. आकाशात पहिले तर लुकलुकणारे असंख्य तारे आपल्याला दिसतात. जणूकाही सुंदर रांगोळीच ! त्या तारका प्रत्यक्षात खूप मोठ्या आहेत. कित्येक सूर्य त्यांच्यात मावतील.रसरसलेले तेजोमय ज्वलंत धातूचे ते गोल आहेत. नुसत्या डोळ्यांना हजारो दिसतात. दुर्बिणीतून पाहू तर कोट्यवधी दिसतात. मोठ्या दुर्बिणीतून त्याहूनही  जास्त दिसतात.या अनादी अनंत सृष्टीचा लहानसा एक भाग म्हणजे आपले जग . 

ही  विशाल सृष्टी ही  परमेश्वरी स्वरूपाची एक बाजू झाली.आता दुसरो बाजू म्हणजे काळाची.आपल्याला माहित इतिहासाचा काळ दहा हजार वर्षांचा. आपल्या आयुष्याचा काळ तर जेमतेम १०० वर्षे ! काळाचा विस्तार अनादि व अनंत आहे. किती काळ झाला त्याचा हिशेब नाही ,पुढे किती आहे ते ही  माहीत नाही.भूतकाळ अनादि व भविष्यकाळ अनंत आहे. लहानसा वर्तमान काळ बोलता बोलता भूतकाळात जातो. असा हा अत्यंत चपळ असा वर्तमान काळ तेवढा आपला आहे.

एका बाजूस स्थळाचा प्रचंड विस्तार व दुसऱ्या बाजूस काळाचा प्रचंड ओघ अशा दोन्ही दृष्टींनी सृष्टीकडे पाहू लागलो की कल्पनेस कितीही ताण दिला तरी तिचा अंत लागणार नाही हे कळून येते.अशा प्रकारे तिन्ही काळात आणि तिन्ही स्थळात व्यापून राहिलेला हा परमेश्वर एकाच ठिकाणी पाहावयास मिळावा अशी अर्जुनास इच्छा झाली. या इच्छेतून हा अकरावा अध्याय प्रगट झाला आहे. 

सामान्य माणसास असे विश्वरूप पाहणे अशक्य आहे. म्हणून ,भगवंतानी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन नंतर विश्वरूप दाखवले.भगवंतांची अर्जुनावर अपार प्रीती. म्हणून त्यांनी प्रेमाचा प्रसाद दिला.   

लहान मूर्तीतही पूर्ण दर्शन होऊ शकते. 

त्या रूपाचे सुंदर वर्णन ,भव्य वर्णन या अध्यात आहे ,तरी या विश्व रूपा  बद्दल आपल्याला विशेष लोभ दाखविण्याचे कारण नाही. जे लहान रूप मी पाहू शकतो ,त्यावर मी संतुष्ट राहावे.अर्जुनाप्रमाणे विश्वरूपाची मागणी करण्याची आपली योग्यताही नाही.  

शिवाय परमात्मा अखंड आहे. तो काय विश्वाचा कापलेला तुकडा नाही.जसे छोटया फोटोत आणि मोठ्या फोटोत एकच चित्र दिसते तसेच, आपणाला कळणाऱ्या छोटया मूर्ती वरून मोठ्या परमात्म्याचे दर्शन समजून घ्यायचे. या विचार पद्धतीचा मूर्तीपूजेला आधार असतो. मूर्ती पूजा म्हणजे काय? एका लहानश्या वस्तूत सर्व विश्व अनुभवण्यास शिकणे म्हणजे मूर्तिपूजा.

काव्यातील उपमा-दृष्टांताना जो आधार तोच मुर्तीपुजेसही  आधार. एखादी गोल वस्तू पहिली की आनंद होतो. कारण तेथे व्यवस्थित पणा असतो. व्यवस्थितपणा हे ईश्वराचे रूप आहे. परंतु जंगलात वाढलेले वाकडे झाड ,तीही ईश्वराचीच मूर्ती. तेथे ईश्वराचा स्वच्छंदीपणा आहे. त्या झालेला बंधन नाही. ईश्वराला कोण बंधन घालणार?गुळगुळीत शाळीग्रामात जे ईश्वरी तेज ,तेच त्या ओबडधोबड नर्मद्या गणपतीत आहे.मला ते विश्वरूप दिसले नाही तरी चालेल. 

माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे तोच त्या वास्तूत आहे असा हा प्रेमाचा संबंध जोडू  लागा म्हणजे प्रत्येक वस्तूत परमेश्वरच दिसू लागेल. भोगवासना सोडून प्रेमाची  पवित्र दृष्टी आली की  अनंत सृष्टीतील देव अणू  रेणूतही दिसेल.उपनिषदात आत्म्याचा रंग कसा असतो याचे सुंदर वर्णन आहे. ऋषी प्रेमाने म्हणतात – यथा अयं इंद्रगोप: – हा जो लाल लाल रेशमासारखा मऊ मृगाचा किडा,त्याच्या सारखे आत्म्याचे रूप आहे.तो मृगाचा किडा पाहिला म्हणजे किती आनंद होतो !  हा आनंद का होतो?माझ्या ठिकाणी जो आनंद आहे तोच त्या इंद्रगोपाच्या ठिकाणी आहे. सारांश ,ईश्वरी रूप प्रत्येक वास्तूत ओतप्रेत भरलेले आहे.तेवढ्यासाठी विराट दर्शनाची आवश्यकता नाही.   

विराट स्वरूप पचणार ही  नाही– 

 ते विराट दर्शन मला सहन तरी कसे होईल?लहान सगुण रूपात मला जे प्रेम वाटते ,जी गोडी वाटते ती कदाचित विश्वरूप पाहताना येणार ही नाही. अर्जुनाची तीच स्थिती झाली. तो थर थर कापत शेवटी म्हणतो,”देवा,तुझे पूर्वीचे गोड रूप दाखव“. विराट स्वरूप पाहण्याची इच्छा करू नका , असे अर्जुन स्वानुभवाने सांगत आहे. 

जसे स्थलात्मक सृष्टीचे ,तसेच कलात्मक सृष्टीचे. आपणास भूतकाळाचे आठवत नाही आणि पुढचे कळत नाही  हे आपल्या कल्याणाचेच आहे.काळ चाळणी मारत आहे. इतिहासातील चांगले तेवढे घेतले पाहिजे. पाप फेकून दिले पाहिजे. वाईट सोडून चांगलेच जर मनुष्य लक्षात ठेवील तर सोने होईल. पण तसे होत नाही. म्हणून विस्मरणाची फार जरुरी आहे. त्यासाठी देवाने मरण निर्मिले आहे. 

सारांश ,जग जसे आहे तसेच मंगल आहे. काल स्थलात्मक जग एके ठिकाणी सारे जवळ आणण्याची जरूर नाही. काही वस्तूंची सलगी करावयाची असते ,कांही पासून दूर अंतरावर राहावयाचे असते.गुरु असला तर नम्रतेने दूर बसू .आईच्या मांडीवर जाऊन बसू. फुलाला जवळ करावे , अग्नीला बेतात राखावे.   

सर्वार्थ-सार –

त्या विश्वरूप वर्णनाचे पवित्र श्लोक वाचावे व पवित्र व्हावे . बुद्धी चालवून परमेश्वराच्या त्या रूपाचे तुकडे करावे असे मला वाटत नाही. 

परमेश्वराच्या ह्या सर्व वर्णनात एके ठिकाणी बुद्धी विचार करू लागते. परमेश्वर अर्जुनाला म्हणतो,”अर्जुना ,हे सारे मरणारे आहेत. तू निमित्त मात्र हो. मी सर्व काही करणार आहे.“ ईश्वराच्या हातातले आपणास हत्यार व्हायचे आहे हा विचार मनात आला की बुद्धी विचार करू लागते. ईश्वराच्या हातातले हत्यार किंवा साधन कसे व्हायचे? 

याचे उत्तर, या अध्यायाच्या शेवटच्या ५५ व्या श्लोकात  दिले आहे.शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात या श्लोकाला ‘सर्वार्थ-सार’ म्हणजेच सर्व गीतेचे सार असे म्हटले आहे.   

ज्याचे जगात कोणाशी वैर नाही,जो तटस्थ राहून जगाची निरपेक्ष सेवा करत आहे, जे जे करील ते ते मला जो देत आहे ,माझ्या भक्तीने भरला आहे , क्षमावान , निःसंग ,विरक्त, प्रेमळ , असा जो  भक्त ;तो परमेश्वराच्या हातातील हत्यार किंवा साधन  बनतो.असे हे सार  आहे.