13 Oct 2022

अध्याय 8 – अक्षरब्रह्मयोग (प्रयाण-साधना : सातत्य योग)

सारांश :

शुभ संस्कारांचा संचय : मनुष्याचे जीवन हे अनेक संस्कारानी भरलेले असते.आपण करीत असलेल्या असंख्य क्रिया ,नाना प्रकारची स्वप्ने ,रागद्वेष ,मानापमान ,सुखदुखः अशा अनेक गोष्टींचे आपल्या मनावर संस्कार होत असतात.चांगले संस्कार तसे वाईट संस्कार ,दोघांचाही मनुष्याच्या जीवनावर परिणाम झालेला असतो.  जीवन म्हणजे संस्कार संचय अशी जीवनाची व्याख्या विनोबाजींनी केली आहे. 

सगळ्या क्रिया आणि सगळे संस्कार आपल्या मनात राहत नाहीत. ठळक तेव्हढे लक्षात राहतात. अशा प्रकारे आयुष्याच्या शेवटी सर्व कर्मांचे दहा पाच  दृढ संस्कार काय ते शिल्लक उरतात. हे संस्कार म्हणजे आपली आयुष्याची पुंजी. शेवटी बलवान असा एक संस्कार साररूप शिल्लक राहतो.अंतकाळीचे स्मरण हे सर्व जीवनाचे फलित होय. मरणाच्या वेळेस जो संस्कार उमटावा  अशी इच्छा असेल त्याला अनुसरून सर्व जीवनाचा ओघ वळवा. तिकडे अहोरात्र कल  असू द्या .  

मरणाचे स्मरण असावे : या आठव्या अध्यायात हा सिद्धांत मांडला आहे की जो विचार मरणकाळी स्पष्ट ठसठशीत पणे उमटला तोच विचार पुढच्या जन्मात बलवत्तर ठरतो. ती शिदोरी घेऊन जीव पुढील यात्रेला निघतो. या जन्माचा अंत ती पुढील जन्माची सुरुवात.म्हणून मरणाचे स्मरण सदैव राखून वागा . 

शिवाय मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हा पापापासून मुक्त होण्यास उपाय आहे. मरण समोर असेल तर कोणत्या हिमतीवर मनुष्य पाप करील?

परंतु मनुष्य मरणाचे स्मरण नेहमी टाळतो. चुकून विषय आला तरी ते बोलणे अभद्र समजतात. मरण हे अटळ आहे. म्हणून आत्तापासूनच उत्कृष्ट संस्कार मनावर कसे राहतील याचा विचार सतत करावा. 

जीभ ,डोळा, कान याना आपण चावचालपणा शिकवून राहिलो आहोत.चित्ताला निराळा अभ्यास लावला पाहिजे. चांगल्याकडे चित्त नेले पाहिजे. तेथे चित्त रंगविले पाहिजे. ज्या क्षणी चूक झाली हे कळले त्या क्षणी ती सुधारण्यास सुरुवात केली पाहिजे. तो क्षण पुनर्जन्माचा. तेथूनच नवे बालपण सुरु .रात्रंदिवस जीवनाचे परीक्षण कर. तसे न करशील तर पुन्हा घसरशील, पुन्हा वाईटाचा अभ्यास सुरु होईल. 

चांगले पाहिन ,चांगले ऐकेन आणि चांगले बोलेन अशी सदैव खटपट केली तर शेवटच्या क्षणाला हुकुमी डाव पडेल. आपण जीवनाचे आणि मरणाचे स्वामी होऊ. सारांश ,बाहेरून सतत स्वधर्माचरण व आतून चित्त शुद्धीची ,हरी स्मरणाची क्रिया,असे आतून बाहेरून कर्म-विकर्माचे प्रवाह जेव्हा काम करतील तेव्हा मरण ही आनंदाची गोष्ट वाटेल.  

आयुष्य आणि आयुष्याचा शेवट सुंदर होण्यासाठी सतत झगडत रहा अशी भगवंतांची आज्ञा आहे. दगडावर एकोणीस घाव घातले तरी तो फुटला नाही .विसाव्या घावाला तो फुटला . मग ते पहिले घाव का अपेशी समजावयाचे?ते पहिले एकोणीस घाव विसाव्या घावाची तयारी करीत होते. 

निराश होणे म्हणजे नास्तिक होणे. परमेश्वर पाठीराखा आहे. विश्वास ठेवा. मुलाला हिम्मत यावी म्हणून आई त्याला इकडे तिकडे जाऊ देते. परंतु ती त्याला पडू देणार नाही. पडला तर हळूच येऊन उचलील. ईश्वर ही  तुमच्याकडे पहात आहे. तुमच्या जीवनाच्या पतंगाची दोरी त्याच्या हातात आहे. ती दोरी तो कधी तंग धरतो तर कधी सैल सोडतो. परंतु दोरा त्याच्या हाती आहे याची खात्री बाळगा.  

शुक्ल कृष्ण गती ( उत्तरायण व दक्षिणायन ):

या अध्यायाच्या शेवटी हे रूपकाने सांगितले  आहे. हे रूपक समजून घ्या.  

ज्याच्या मरणाचे वेळी अग्नी पेटलेला आहे,सूर्य प्रकाशत आहे,शुक्ल पक्षातील चंद्रमा वाढून राहिला आहे,उत्तरायणातील  निरभ्र व सुंदर आकाश पसरले आहे तो ब्रह्मात विलीन होतो. आणि ज्याच्या मरणाचे वेळी धूर धुमसून राहिला आहे ,अंतर्बाह्य अंधार आहे,कृष्ण पक्षातील चंद्रमा क्षीण होत आहे,दक्षिणायनात ते अभ्राच्छादित मलिन आकाश पसरलेले आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकेल.  

पुष्कळ लोक या रूपकाने घोटाळ्यात पडतात. पुण्य मरण यावे असे वाटत असेल तर अग्नी,सूर्य,चंद्र,आकाश या देवतांची कृपा असली पाहिजे. अग्नी हे कर्माचे चिन्ह आहे ,यज्ञाची खूण आहे. अंत काली सुद्धा या कर्म यज्ञाची ज्वाला  पेटलेली असावी. 

न्यायमूर्तो रानडे म्हणत,” सारखे कर्तव्य करीत असता मरण आले तर ते धान्य होय “. पेटलेला अग्नी याचा हा अर्थ आहे. सूर्याची कृपा म्हणजे बुद्धीची प्रभा शेवटपर्यंत  झगझगीत राहणे. चंद्राची कृपा म्हणजे मरणाच्या वेळी पवित्र भावना वाढतच जाणे. 

सारांश,उत्तरायण असणे म्हणजे हृदयात आसक्तीचे ढग नसणे . 

शेवटच्या श्वासापर्यंत हातून सेवा होऊन राहिली आहे,भावनांची पौर्णिमा फुलली आहे ,हृदयाकाशात थोडीही आसक्ती नाही,बुद्धी सतेज आहे अशा प्रकारे ज्याला मरण येईल तो परमात्म्यात मिळाला.असे बळ मिळावे म्हणून त्या मारामेश्वराची प्रार्थना करीत राहिले पाहिजे. नामस्मरण,तत्त्व स्मरण पुन्हां पुन्हा करत राहिले पाहिजे.