11 Oct 2022

अध्याय 7 – ज्ञानविज्ञानयोग  ( प्रपत्ति अथवा ईश्वर – शरणता )

सारांश :

सहाव्या  अध्यायात साधनेला लागणारी एकाग्रता सांगितली. या अध्यायात  आपण ईश्वर शरणतेच्या दालनात शिरणार आहोत.पण त्या आधी या जगाच्या रचनेचे रहस्य समजावून सांगितले आहे ते पाहू . 

ही  सारी अंतर्बाह्य सृष्टी  एकच एक अखंड आत्मा आणि एकच एक अष्टधा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून निर्माण झाली आहे.(अष्टधा म्हणजे पृथ्वी ,जल ,अग्नी,वायू आणि आकाश ही पंचमहाभूते + मन ,बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी बनलेली प्रकृती ). क्रोधी माणसाचा क्रोध,प्रेमळ माणसाचे प्रेम ,दुःखिताचे चे रडणे,आनंदी माणसाचा आनंद ,आळश्याचा  झोपेकडील कल,उद्योगी  माणसाचे कर्म स्फुरण हे सारे एकाच चैतन्य शक्तीचे – परमात्याचे-  खेळ आहेत. चैतन्यमय आत्मा आणि जड प्रकृती या दुहेरी मसाल्यातून सारी सृष्टी जन्मली आहे असे आरंभीच भगवान सांगून राहिले आहेत. 

आत्मा व देह ,परा व अपरा प्रकृती सर्वत्र एकच. असे असताना माणसास मोह का पडतो? ही  सारी त्या सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराची कला आहे. हा मोह टाळायचा  असेल तर परमेश्वराला ओळखता आले पाहिजे. 

या सातव्या अध्यायात ,परमेश्वर समजून घेण्याचे एक महान साधन , भक्ती हे सांगितले आहे. चित्त शुद्धी साठी यज्ञ-दान ,जप-तप ,ध्यानधारणा इत्यादी विशेष कर्मे सांगितली जातात . पण या सर्वात जिव्हाळा नसेल तर चित्त शुद्धी कशी होणार?जिव्हाळा म्हणजेच  भक्ती. 

माणसांना पंच ज्ञानेंद्रियांना छान वाटण्याऱ्या गोष्टी मिळाल्या कि आनंद वाटतो. उदा. छान गाणे ऐकणे ,चवीने खाणे,छान चित्र पहाणे इत्यादी. पण हा आनंद क्षणिक असतो. परमानंद मात्र कायम स्वरूपी असतो . हा परमानंद शोधून काढण्यासाठी भक्ती हा उत्कृष्ट मार्ग आहे. 

सकाम भक्तीलाही किंमत आहे:

 भगवंतांनी भक्तांचे तीन प्रकार सांगितले आहेत. 

(१)  सकाम भक्ती करणारा – काही इच्छा घेऊन देवाकडे जाणारा.

भगवान म्हणतात ,” माझा भक्त सकाम असला तरीही मी त्याची भक्ती दृढ करीन.त्याच्या मनात घोटाळे उत्पन्न करणार नाही . माझा रोग बरा कर देवा , असे तो कळवळून म्हणेल तर त्याची आरोग्याची भावना राखून मी त्याचा रोग बारा करिन.”

कोणत्याही निमित्ताने भक्तिच्या  मंदिरात पाय ठेवा म्हणजे झाले. प्रथम कामनेने आलात तरी पुढे निष्काम व्हाल. 

(२) निष्काम परंतु एकांगी भक्ती करणारा –  निष्काम परंतु एकांगी भक्ती करणाऱ्यांत पुन्हा तीन प्रकार आहेत ,

(अ )आर्त – म्हणजे ओलावा पाहणारा ,देवासाठी रडणारा किंवा विव्हळणारा. उदा. नामदेवाला ,देवाच्या पायी मी केव्हा जडेन अशी आर्त तगमग होती.  

(ब) जिज्ञासू – याच्या जवळ अदम्य जिज्ञासा असते . कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधात जातील,कोणी जवलामुखीत उतरतील इत्यादी. जिज्ञासूही शेवटी देवाला जाऊन मिळेल.  

(क) अर्थार्थी – म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा .अर्थ म्हणजे पैसे नव्हे . अर्थ म्हणजे हित किंवा कल्याण 

थोडक्यात ,प्रेमाच्या दृष्टीने सर्व क्रियांकडे पाहणारा तो आर्त ,ज्ञानाच्या दृष्टीने पाहणारा तो जिज्ञासू आणि सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने पाहणारा तो अर्थार्थी. 

(३)ज्ञानी म्हणजे संपूर्ण भक्ती करणारा – याला जे दिसेल ते देवाचे रूप वाटते .कुरूप-सुरूप ,राव-रंक ,पशु-पक्षी ,स्त्री-पुरुष सर्वत्र परमात्म्याचे पावन दर्शन. अशा प्रकारे एकच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे हे पाहण्याचा ज्ञानी भक्ताचा अभ्यास चालू असतो. असे करता करता एक दिवस तो ज्ञानी भक्त ईश्वरातच मिळून जातो.