05 Oct 2022

अध्याय ४ -सारांश : कर्मयोग-सहकारी-साधना म्हणजेच विकर्म

सर्वात आधी आपण विकर्म शब्दाचा अर्थ समजून घेऊ. विकर्म शब्दाचा अर्थ सामान्यपणे चुकीचे कर्म किंवा निषिद्ध कर्म असा केला जातो. परंतु विनोबाजींनी त्याचा अर्थ वेगळा लावला आहे. विकर्म शब्दातील ‘वि चे तीन वेगळे अर्थ आहेत.

 (१) विरुद्ध  .. जसे  वियोग 

 (२) वेगवेगळे प्रकार .. जसे विज्ञान 

 (३) विशेष .. जसे विध्वंस  

विनोबाजींच्या मते ,एखाद्या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार घ्यावा लागतो. चौथ्या अध्यायातील तिन्ही शब्द कर्म ,विकर्म आणि अकर्म समजून घेतल्यावरच आपल्याला कर्मयोग समजेल. विरुद्ध किंवा निषिद्ध कर्माचा कोठेही उल्लेख नाही. ( तसे असते तर  त्या  कर्मांबद्दल  लिहिले  असते.) परंतु वेगवेगळी विशेष कर्मे जी स्वधर्म आचरणास मदत करतात, ती २५ ते ३२ या श्लोकांत सांगितली आहेत. म्हणून विकर्म चा अर्थ विशेष कर्म असाच अभिप्रेत असावा. 

परंतु आपल्याला शब्दांच्या अर्थावर वाद विवाद करण्याची गरज नाही. 

ज्यांना  विकर्म  म्हणजे विरुद्ध/निषिद्ध  कर्म वाटते त्यांनी संयमाने विकर्मे टाळावीत . ज्यांना  विकर्म  म्हणजे विशेष कर्म ( किंवा चित्त शोधना साठी करावयाचे कर्म )  वाटते त्यांनी विकर्मे प्रयत्नपूर्वक करावीत.म्हणजे आपल्याला सत्य समजून येईल. 

कर्माला विकर्माची जोड हवी :

मित्रानो,मागील अध्यायात आपण निष्काम कर्माचे विवेचन केले.आपण स्वधर्म कधीच सोडू नये हे सुद्धा पाहिले.निष्कामता हा मनाचा धर्म आहे. हा मनाचा धर्म उत्पन्न होण्यास स्वधर्माचरण एव्हढे एकच साधन पुरेसे नाही.दुसऱ्या साधनांचाही अवलंब करावा लागेल. केवळ तेलवातीने दिवा लागत नाही ,तेथे ज्योतीची गरज असते. ज्योत असेल तरच अंधार दूर होईल. हि ज्योत कशी पेटवावी?त्यासाठी मानसिक संशोधन हवे. आत्मा परीक्षण करून चित्तावरील खळ मळ धुवून टाकला पाहिजे. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी हीच महत्त्वाची सूचना भगवंतांनी दिली होती . त्या सूचनेतूनच चौथ्या अध्यायाचा जन्म आहे.   

गीतेत ‘कर्म’ हा शब्द ‘स्वधर्म ‘ या अर्थाने वापरला आहे . आपण खातो,पितो,झोपतो ही कार्मेच आहेत. परंतु या क्रिया गीतेतील कर्म या शब्दाने सुचविल्या नाहीत. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्म आचरणाची स्थूल क्रिया. उदा. शेती करणे ,व्यापार करणे ,व्यवसाय करणे,सुतारकाम ,लोहारकाम इत्यादी. या बाहेरच्या कर्मात चित्त ओतणे म्हणजेच विकर्म. बाह्य कर्माशी आतून चित्त शुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग लाभतो. कर्माबरोबर विकर्म आले की हळूहळू निष्कामता अंगी बाणते.केवळ बाह्य तंत्राला महत्त्व नाही. केवळ कर्महीन मंत्रालाही महत्त्व नाही. हातात सेवा हवी व हृदयात ही  सेवा हवी.तरच खरी सेवा हातून घडेल. 

कर्म + विकर्म = अकर्म 

कर्माच्या जोडीला विकर्म  आले की म्हणजे निष्कामता येते.तेल आणि वात  यांच्या जोडीला ज्योत आली की प्रकाश पडतो.

कर्म हे ज्ञानाचे पेटवणं आहे. एखादा लाकडाचा ओंडका पडलेला असतो. परंतु त्या लाकडाला पेटवा ,तो धगधगीत निखारा होतो. कर्मात विकर्म ओतले की कर्म दिव्य दिसू लागते.हे दिव्य कर्म म्हणजेच अकर्म. अकर्म होते म्हणजे कर्म केल्यासारखे वाटतच नाही. कर्म करून पुसून टाकल्यासारखे होते. 

कर्माचे अकर्म कसे होते ते आपण संतांकडून शिकावे. सर्व काही करून न केल्यासारखे.

सध्या ज्ञानाचा खूप प्रसार होत आहे. अनंत पुस्तके आहेत ,इंटरनेट आहेत. एवढा प्रसार असून सुद्धा मनुष्याचे डोके खोके कसे? कोणी म्हणतात स्मरण शक्ती कमी झाली. कोणी म्हणतात एकाग्रता होत नाही.कोणी म्हणतात विचार करण्यास वेळच नाही ! भगवान अर्जुनास म्हणतात ,” ऐकून ऐकून घोटाळ्यात पडलेली तुझी बुद्धी स्थिर झाल्याशिवाय योग तुझ्या हातात पडणार नाही. ऐकणे वाचणे आता पुरे करून संताना शरण जा. तेथे जीवनाचा ग्रंथ तू वाचशील.” आपल्यासारख्या सामान्य माणसांना याहून सोपा मार्ग नाहीच!