22 Sep 2022

सांख्य योग : सर्व उपदेश थोडक्यात – आत्मज्ञान आणि समत्व बुद्धी 

मित्र  हो, मागच्या अध्यायात आपण अर्जुन विषाद योग  पाहिला.

दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस प्रारंभ झाला .दुसऱ्या  अध्यायातील ‘सांख्य योग’ शब्दाचा अर्थ विनोबाजींनी ,जीवनाचे मूलभूत सिद्धान्त असा केला आहे.सांख्य म्हणजे सिद्धांत किंवा शास्त्र आणि योग म्हणजे कला .युज शब्दावरून योग हा शब्द आला.युज म्हणजे जोडणे. जीवनाचे सिद्धांत जोडण्याची (अमलात आणण्या ची) युक्ती किंवा कला म्हणजे सांख्य योग.सांख्य योगाला ‘जीवन सार योग ‘ असे ही  म्हणता येईल. 

जीवनाचे मूलभूत सिद्धांत असे,

(१)आत्म्याची अमरता आणि अखंडता . 

आपण सजीव मनुष्य , प्राणी ,पक्षी किंवा सजीव वनस्पती पाहतो. यातील जीव निघून गेला की राहते ते निर्जीव शरीर . जीव म्हणजे आत्मा.  

२० व्या श्लोकात आपण पाहिले,हा आत्मा   कधीही जन्मत नाही आणि मरत ही नाही . तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही .कारण हा जन्म नसलेला ,नित्य,सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही . 

२२व्या श्लोकात आपण पाहिले , ज्या प्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नऊ वस्त्रे घेतो ,त्याच प्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो . 

२३ व्या श्लोकात आपण आत्म्याचे वर्णन पाहिले .या आत्म्याला शास्त्रे कापू शकत नाहीत ,विस्तव जळू शकत नाही ,पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वळवू शकत नाही . 

म्हणजे आत्मा मरत नाही. मग शरीर सोडल्यावर तो जातो कोठे? तो दुसऱ्या शरीरात स्थापित होतो.  

(२)देहाची क्षुद्रता :

देह क्षुद्र आहे तर आत्मा हा परमात्म्याचा अगदी छोटासा अंश आहे . म्हणून आत्मा अमर आहे.आपण कायम लक्ष्यात ठेवले पाहिजे ,’मी मरतुकडा देह नव्हे, देह केवळ वरचा क्षुद्र पापुद्रा आहे. मी कधीही न मरणारा ,अखंड आणि व्यापक आत्मा आहे. हेच आयुष्याचे तत्वज्ञान आहे. 

देह आतून बाहेरून अस्वच्छ होतो .आत्मा त्याला स्वच्छ ठेवतो. देहाला रोग जडतात ,आत्मा त्याला औषध पाणी करतो . देह ६-७ फुटात मावतो तर आत्मा त्रिभुवन विहारी .देह परिवर्तनशील ( बाल्य,तारुण्य ,वृद्धत्व )तर आत्मा ही परिवर्तने पाहत  असतो.  देह मरतो  तर आत्मा मरणाचा व्यवस्थापाक. म्हणून , देहाचा नाश ही  काय शोक करण्याची   गोष्ट आहे?

देह हा वस्त्र सारखा आहे .जुने फाटले की  आपण नवीन घेतो .त्या प्रमाणे आत्मा शरीर बदलतो. आत्मा अविनाशी आणि निरंतर आहे.तेव्हा मृत्यूची भीती मुळीच नको. कुणाच्या मृत्यू नंतर रडणे ओरडणे नको . काही लोकांची मजल तर रडणाऱ्या लोकांना मजुरी देऊन बोलावण्या पर्यंत गेली आहे! ( भारतातील काही समाजात ,विशेषतः राजस्थान आणि गुजराथ मधील काही भागात अशी रूढी आहे. )

याचा अर्थ आपण कठोर आणि प्रेमशून्य व्हावे असे नाही . पण देहासक्ती म्हणजे प्रेम नव्हे.उलट देहासक्ती दूर सारल्याशिवाय  खऱ्या प्रेमाचा उदयच  होत नाही. स्वधर्म आचरणासाठी आपल्या देहाला जरूर सांभाळले पाहिजे .त्याला खायला प्यायला दिले पाहिजे. पण जिभेचे चोचले पुरविण्याची गरज नाही.देहाला साधन म्हणून वापरले पाहिजे. तसे न करता बऱ्याच  वेळा आम्ही त्या देहात बुडून आत्मसंकोच  करून घेतो. 

(३)स्वधर्माची अबाध्यता . 

हा  तिसरा स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्य रूप आहे .पहिले दोन ज्ञातव्य ( म्हणजे जाणून घेण्या योग्य ) आहेत. 

 हा स्वधर्म आपणास निसर्गतःच प्राप्त होतो.तो शोधावा लागत नाही. आपण आपले आईबाप शोधत नाही . आपण आपल्या आईची सेवा करणे ,ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाची सेवा करणे हे आपल्याला  ओघानेच मिळते. आपल्याबरोबर आपला स्वधर्म  जन्मतो. स्वधर्म आपल्या जन्माचा हेतू आहे. आपली आई कशीही असली तरी आपण तिला टाळू सशक्त नाही .आई स्वभावातच सिद्ध आहे. तसेच स्वधर्माचे आहे. स्वधर्म टाळू पाहणे हे स्व ला  नाकारण्या सारखे आत्मघातकी आहे.स्वधर्माच्या आश्रयाने आपल्याला पुढे जायचे आहे. येथे धर्म म्हणजे हिंदू ,मुसलमान,ख्रिस्त असा अर्थ नाही हे पूर्वीच आपण पाहिले आहे.शिवाय प्रत्येकाचा स्वधर्म त्याच्या आयुष्याच्या काळात आपापल्या अनुभव आणि वृत्ती प्रमाणे बदलत जातो ,हे ही  आपण पूर्वी पाहिले आहे.           

कर्म :काम ( कर्म ) करण्याच्या दोन वृत्ती दिसतात . एक म्हणजे मी काम करतो ,त्याचे फळ मला मिळालेच पाहिजे.थोडेसे  निकृष्ट फळ चालणार असेल तर थोडे निकृष्ट काम करून चालेल.या वृत्तीने उत्कृष्ट काम होणार नाही.दुसरी वृत्ती म्हणजे मला फळ मिळणार नसेल तर मी कामच करणार नाही. याला केवळ आळस म्हणावा लागेल. गीता म्हणते “ कर्म तर कराच पण फळाचा अधिकार सोडून द्या आणि जे काम कराल ते उत्कृष्टच करा . तुमच्या कामाला चित्ताच्या समत्वाची जोड द्या  ”.म्हणून निष्काम ( फळ सोडून ) कर्म हा योग आहे किंवा ती जीवनाची कला आहे. 

हे ऐकून अर्जुन कृष्णाला म्हणाला ,” मला हे जीवनाचे सिद्धांत सांगितलेस ,पण ते आचरणात कसे आणावे ते सांग. किंवा सांख्य निष्ठा  ज्याच्या बुद्धीत स्थिर झाली आहे ,फलत्यागरूप योग ज्याच्यात मुरला आहे अशा माणसाची – म्हणजे स्थितःप्रज्ञाची – लक्षणे मला सांग”. ह्या साठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या अठरा श्लोकात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत.        

स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा मनुष्य.परंतु संयमा शिवाय बुद्धी स्थिर कशी होईल? म्हणून स्थितप्रज्ञ संयम मूर्ती वर्णिला आहे.स्थितप्रज्ञ सर्व इंद्रियांना लगाम घालून ती कर्म योगात राबवतो. इंद्रिये सैल सोडणे सोपे आहे ,पण विषय भोगातून इंद्रिये आवरून घेणे आणि परमार्थ कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे फार कठीण आहे. त्यासाठी महान प्रयत्न पाहिजेत.इतके करून संयम प्रत्येकाला साधेल असे नाही. त्यामुळे साधकाने त्याचे सर्व प्रयत्न करून सुद्धा ते जेथे कमी पडतील तेथे भक्तीची जोड द्यावी अशी मोलाची सूचना स्थितप्रज्ञाच्या लक्षणात भगवंतानी देऊन ठेवली आहे.  

थोडक्यात ,

( निर्गुण ) सांख्य बुद्धी  + ( सगुण ) योग बुद्धी + ( साकार ) स्थितप्रज्ञ —> सांख्य योग (म्हणजेच संपूर्ण जीवशास्त्र)–>   

 ह्यातून फलित ब्रह्म निर्वाण उर्फ मोक्ष ! आणखी दुसरे काय?

  

  • सुखी, आनंदी जीवनासाठी गीतेतील ‘हे’ उपदेश अत्यंत उपयुक्त धन्यवाद.खूप छान ब्लॉग होता.