15 Sep 2022

अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥1॥

सारांश : प्रास्ताविक आख्यायिका – अर्जुनाचा विषाद

रामायण आणि महाभारत हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. महाभारत ऋषी व्यास यांनी लिहिले. भगवद्गीता ही महाभारताचा  एक भाग आहे.  भगवद्गीता महाभारताच्या मध्यभागी दीपस्तंभाप्रमाणे उभी आहे . सर्व महाभारताचे नवनीत व्यासांनी गीतेत दिले आहे.

केवळ निर्दोष फक्त परमेश्वर आहे.हे जग गुण दोषांनी भरलेले आहे.गीतेमध्ये, भीष्म-युधिष्ठिर  यांचे दोष सुद्धा दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे येथे कर्ण आणि दुर्योधन यांचे गुणही दाखवले आहेत.  

बऱ्याच लोकांना असे वाटते की गीतेची सुरवात दुसऱ्या अध्यापासून धरावी.  कारण खरा उपदेश दुसऱ्या अध्यायाच्या ११ व्या श्लोकापासून सुरूहोतो. परंतु पुढचा उपदेश समजून घेण्यापूर्वी युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाची मन:स्थिती कशी होती हे स्पष्ट होण्यासाठी पहिल्या अध्यायाची आवश्यकता आहे . व्यासांनी  कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात गीता मांडली आहे .त्यामुळे वाचकांना गीता समजून घेणे सोपे झाले आहे. 

काही लोक म्हणतात गीता अर्जुनाची भीती ( क्लैब्य ) दूर  करून त्याला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी लिहिली आहे. अर्जुन शेकडो लढाया खेळलेला महावीर होता.  उत्तर गो ग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म – द्रोण -कर्ण यांना हतबल केले होते. तो कशाला घाबरेल ? तेव्हा  क्लैब्य निरसन एव्हडे सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित. तसेच अर्जुनाची अहिंसा वृत्ती दूर  करणे हा ही हेतू नाही , कारण तो कर्तव्य बुद्धीने सर्व सामोपचाराचे उपाय थकल्यावर रणांगणावर उभा होता. 

आप्तेष्टांना  युद्धात समोर पाहून आसक्ति जन्य  मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली होती .  कर्तव्य निष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला की नागडी कर्तव्यच्युती त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवतो. अर्जुनाचे असेच झाले. आता युद्धच मुळात पाप आहे असे तो प्रतिपादन करू लागला.युद्धाने कुलक्षय होईल ,धर्म लोपेल ,व्यभिचार माजेल,समाजावर संकटे येतील असे तो कृष्णाला सांगू लागला . 

या नंतर अर्जुनाच्या सर्व शंकांना श्रीकृष्णाने उत्तर दिले व मोह नाश झाल्या नंतर तो युद्धास तयार झाला.ही सर्व   प्रश्नोत्तरे आपण पुढच्या अध्यायात अभ्यासणार आहोत. 

युद्ध हे अर्जुनाला स्वभाव प्राप्त आणि अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते. ते तो मोहाने टाळू पाहत होता.गीतेची या मोहा वरच मुख्य गदा आहे. स्वधर्म विरोधी मोहाचा निरास करून ,निष्काम कर्म करीत राहणे हीच गीतेची मुख्य शिकवण  आहे.

येथे स्वधर्म म्हणजे हिंदू ,मुसलमान ,ख्रिस्त या अर्थाने नव्हे.स्वाभाविकपणे आपल्याला मिळालेले काम म्हणजे स्वधर्म.स्वधर्म आपल्या आयुष्यात काळा प्रमाणे बदलत जातो. चिंतनाने ,अनुभवाने वृत्ती पालटत  जाते तसतसा पूर्वीचा धर्म गळत  जातो आणि नवीन लाभत असतो.

अर्जुनाची कृष्णावर अनन्य भक्ती होती. त्याने कृष्णाने सांगितले तसे केले.त्याला विजय लाभ झाला.आपणही कृष्णाने सांगितलेल्या मार्गाने जाऊ.तो पार्थसारथी आपलेही सारथ्य करील आणि विजय लाभ करून देईल .   

  • सोप्या आणि सरळ भाषेत लिहिले आहे, त्यामुळे समजण्यास सोपे जाते. तुमचे धन्यवाद असा छान ब्लॉग लिहल्याबद्ल.